अहमदाबाद – गुजरात उच्च न्यायालयातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर न्यायाधीशांना आपल्या चुकीची जाणीव झाल्याने त्यांनी बिनशर्त माफिही मागितली आहे. सध्या या प्रकरणाची गुजरातसह देशभरातील न्यायालयीन वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
हा सगळा प्रकार 23 ऑक्टोबर रोजी गुजरात उच्च न्यायालयात घडला. सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण होत असल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा आणि व्हिडीओ लागलीच व्हायरल झाले. गुजरात उच्च न्यायालयातील चौथे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांचे एका प्रकरणाच्या निकालावरून दोन सदस्यीय खंडपीठातील त्यांच्या सहकारी महिला न्या. मौना भट यांच्याशी वाद झाला. हा वाद एवढा वाढला की न्या. बिरेन वैष्णव यांनी सुनावणी चालू असतानाच हातातील फाईल टेबलावर भिरकावून दिली.
Heated exchange between Gujarat High Court judges in open court on Monday and the hearing stopped midway! pic.twitter.com/ci9rRUappG
— WorldSoHigh🪷 (@KhataPitaPeople) October 24, 2023
न्या. मौना भट यांच्यावर ते चांगलेच संतापल्याचे व्हिडीओमधून दिसून येत आहे. त्यापाठोपाठ त्यांनी त्या दिवशी पुढे कोणत्याही प्रकरणाची सुनावणी होणार नाही असे सांगून टाकले!
इन्कम टॅक्सशी संबंधित एका प्रकरणाची न्यायालयात सुनावणी चालू होती. प्राप्तीकर विभागाने गेल्या सहा वर्षांचा लेखाजोखा पुन्हा एकदा करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती वैष्णव यांनी यासाठी परवानगी दिली. मात्र, या आढाव्यासंदर्भातला अंतिम आदेश न्यायालयाच्या परवानगीशिवाय दिला जाऊ नये, अशी अट त्यांनी घातली. त्यावर न्यायमूर्ती भट काही टिप्पणी करत असताना न्यायमूर्ती वैष्णव संतप्त झाले.
मग तुम्ही या निकालावर असहमती दर्शवा ना. तुम्ही एका प्रकरणात असहमीत दर्शवली आहे, मग दुसऱ्या प्रकरणातही असहमती दर्शवा. पुटपुटू नका. तुम्ही असहमत असाल तर स्वतंत्र निकाल द्या, असे न्यायमूर्ती वैष्णव यांनी भट यांना सांगितले.
दरम्यान, आधी सुनावणीदरम्यान झालेला वाद आणि नंतर न्यायमूर्ती वैष्णव यांनी जाहीरपणे मागितलेली माफी या घडामोडींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुजरात न्यायालयाने हे व्हिडीओ हटवण्याचे निर्देश यूट्यूबला दिले आहेत.
जाहीर माफी!
दरम्यान, हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर न्यायमूर्ती वैष्णव यांनी 25 ऑक्टोबर रोजी बिनशर्त माफी मागितली. न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यापूर्वी सोमवारी जे काही घडले त्यासाठी मी माफी मागतो. माझ्याकडून चूक झाली. त्यासाठी मी माफी मागतो आणि आपण कामकाजाला सुरुवात करू. जे घडले ते घडायला नको होते, असे न्या. वैष्णव यांनी मान्य केले.