मुंबई – दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) ‘कुछ कुछ होता है’ (kuch kuch hota hai) हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल यांची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली होती. आजही या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. 16 ऑक्टोबर 1998 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त करणने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “25 वर्षांपूर्वीची ती वेळ होती जिथे हे सर्व सुरू झाले होते आणि आज आम्ही इथे फक्त चित्रपटच नाही, तर भावना आणि प्रेम साजरे करत आहोत. मला वाटते की हे सर्वांसाठी आहे. प्रेम आणि मैत्रीच्या या कथेला प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप धन्यवाद मानतो. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्गजांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली होती. माझा चित्रपट पाहणाऱ्या सर्व लोकांचा मी सदैव ऋणी राहिल. हा चित्रपट माझ्या कायम जवळचा असेल.” या पोस्टद्वारे करणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
‘कुछ कुछ होता है’ ला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी रात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राणी मुखर्जी, शाहरुख खान आणि करण जोहर उपस्थित होते. दरम्यान, करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.