धर्मशाला :– डेव्हीड मलानने फटकावलेले वादळी शतक, ज्यो रूटची उपयुक्त खेळी व गोलंदाजांनी केलेल्या अचुक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी बांगलादेशचा 137 धावांनी पराभव केला. डेव्हीड मलान हा सामन्याचा मानकरी ठरला.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा इंग्लंडला फलंदाजी दिली. इंग्लंडला शतकी सलामी देताना जॉनी बेअरस्टो व डेव्हीड मलान यांनी अफलातून फलंदाजी केली. बेअरस्टो अर्थशतकानंतर लगेचच परतला. त्याने 59 चेंडूत 8 चौकारांसह 52 धावा केल्या. त्यानंतर ज्यो रूटने मलानला सुरेख साथ दिली. दरम्यान मलाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने दीडशतकी भागीदारी करताना संघाला अडीचशे धावांचा पल्ला पार करुन दिली.
मलानने अर्धशतकाचे रुपांतर शतकात करताना तुफानी फटकेबाजी केली. त्याने 107 चेंडूंचा सामना करताना 16 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 140 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर जोस बटलर व हॅरी ब्रुक्स यांनी प्रत्येकी 20 धावा रताना संघाचे त्रिशतक फलकावर लावले. रूट अर्धशतकानंतर शतकाकडे कूच करत होता. मात्र, त्यानेही अनावश्यक फटका मारत 82 धावांवर आपली विकेट फेकली. या खेळीत 68 चेंडूत 8 चौकार व 1 षटकार मारला. सॅम कुरेन, ख्रिस वोक्स व आदील रशीद यांनी थोडीफार चमक दाखवताना संघाला साडेतीनशे धावांचा टप्पा पार करुन दिला. बांगलादेशकडून मेहदी हसनने 4 तर, शोरीफुल इस्लामने 3 बळी घेतले.
England step up in Dharamsala to garner their first #CWC23 win ⚡#ENGvBAN 📝: https://t.co/DIx6z6HF4n pic.twitter.com/NmXFDkWjaQ
— ICC (@ICC) October 10, 2023
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 365 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 227 धावांवर रोखला गेला. त्यांच्याकडून सलामीवीर लिंटन दासने 66 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 76 धावा केल्या. त्यानंतर मुश्फीकुर रहीमने 51 धावांची खेळी केली. त्यात 64 चेंडूत 4 चौकार मारले. तळातील तौहीद हिरदोय 39 धावांवर बाद झाला. त्यानंतर शोरीफुल इस्लाम व तस्किन अहमद यांनी थोडी चमक दाखवली मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत व त्यांचा डाव 227 धावांवर संपला. इंग्लंडकडून रीस टोपले यानं सर्वाधिक 4 तर ख्रिस वोक्स यानं 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड – 50 षटकांत 9 बाद 364 धावा. (डेव्हीड मलान 140, ज्यो रूट 82, जॉनी बेअरस्टो 52, मेहदी हसन 4-74, शोरीफुल इस्लाम 3-75).
बांगलादेश – 48.2 षटकांत सर्वबाद 227 धावा. (लिंटन दास 76, मुश्फीकुर रहीम 51, रीस टोपले 4-43, ख्रिस वोक्स 2-49).