शिवाजीराव आढळराव पाटील यांची बैलगाडा शर्यतीला भेट
मंचर – वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील अर्धपीठ गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. शासनाकडे पाठपुरावा करून “ब’ वर्ग मिळवून देऊ, अशी ग्वाही शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
गणेश फेस्टिवलनिमित्त श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे आयोजित बैलगाडा शर्यतीला आढळराव पाटील यांनी भेट दिल, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कुलस्वामी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भास्कर डोके, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख संतोष डोके, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, शिवाजी राजगुरू उपस्थित होते.
ते म्हणाले, बैलगाडा शर्यती निर्विघ्नपणे पार पडत आहेत. मात्र, बैलगाडा मालकांनी नियम व अटीचे काटेकोरपणे पालन करावे. पुणे फेस्टिवल सुरू झाल्यानंतर श्रीक्षेत्र वडगाव येथे गणेश फेस्टिवलची परंपरा सुरू झाली ती सुरूच आहे. देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे.
देवस्थान ट्रस्टने प्रस्ताव द्यावा, शासन दरबारी प्रयत्न करून “ब’ वर्ग मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर उद्योजक दिलीप शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
बैलगाडा शर्यतप्रकरणी सहा गुन्हे दाखल
अर्धपीठ गणपतीच्या विकासकामांसाठी निधीची मागणी ग्रामस्थांनी केली. यावर बोलताना अजित पवार आता सत्तेत आले आहेत. ते जिल्ह्याचे पूर्वी पालक मंत्री होते, आता चंद्रकांत पाटील आहेत. सध्या जिल्हा नियोजन मंडळाचा निधी मिळत नाही. दोन दादांच्या भांडणात या दादांची अडचण झाली आहे, अशी मिश्किल टिप्पणी आढळराव यांनी करताच यावेळी हास्यकल्लोळ उडाला. बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी केलेल्या प्रयत्नात माझ्यावर सहा गुन्हे दाखल असून न्यायालयात वारंवार जावे लागत आहे.