पुणे -“नमामि चंद्रभागा’ अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यामध्ये येणाऱ्या सर्व नद्यांचे सर्वेक्षण करून सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्यास केंद्र सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. या नद्यांमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी, झालेली अतिक्रमणे, नद्यांच्या आजूबाजूला असलेली गावे आणि कंपन्या यांच्या अभ्यास करण्याबरोबरच नदी सुधारणेसाठीच्या उपाययोजना यांचा समावेश या अहवालात असणार आहे.
नदी संरक्षण आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने “नमामि चंद्रभागा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत “पीएमआरडीए’च्या माध्यमातून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच त्यांचे संरक्षण आणि त्या पुनरुज्जीवित करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी “नमामि चंद्रभागा’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या पुढे चंद्रभागेला मिळतात. तर, चंद्रभागा कृष्णेला मिळते. या सर्व नद्यांचे सुधारणा प्रकल्प अहवाल प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता.
विविध उपक्रमांचा प्रस्ताव
प्रदूषण कमी करणे, सुशोभीकरण आणि पूर नियंत्रण अशा तीन पातळीवर पुणे विभागात हा उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे. पुणे जिल्ह्यातील नदीपात्रांचा विकास करणे, पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील प्रदूषित पाणी नदीत जाऊ नये, यासाठी सांडपाण्याचे ऑडिट, शुद्धीकरणातील तूट भरून काढणे, निधी उपलब्ध करण्यासारख्या उपाययोजना प्रस्तावित आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
आयआयटीची मदत
यासाठी मुंबई आयआयटी आणि तेलंगणातील वारंगल इन्स्टिट्यूट यांच्या मदतीने सर्व्हेक्षण करून डीपीआर तयार करण्यात येणार आहे. यात नद्यांचा इतिहास, गेल्या चाळीस वर्षांतील पुराचा अभ्यास देखील केला जाणार असून त्यासाठी “एमआरसॅक’ या शासनाच्या संस्थेकडून नकाशे घेतले जाणार आहे.
असे आहे भौगोलिक स्थान
पुणे जिल्ह्यातून 32 नद्या वाहतात. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नाशिक तर त्याखालोखाल पुणे जिल्ह्यातून नद्या वाहतात. देशातील सर्वात मोठ्या नद्यांमध्ये कृष्णा नदीचा दुसरा नंबर लागतो. या नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. सोलापूर जवळ कृष्णानदीला चंद्रभागा येऊन मिळते. बंगालच्या उपसागरास जाऊन ही नदी मिळते. सुमारे 1400 किलोमीटर लांबीची ही नदी असून तिचे खोरे 2 लाख 58 हजार किलोमीटर एवढे आहे.