पुणे ग्रामीण – दौंड तालुक्यातील यवत ते नाथाचीवाडी रा.मा. ०९ चे काम ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून याची प्रामाणिक अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक व ग्रामस्थ करीत आहेत. दिवसा करण्याचे रस्त्यांचे काम दौंड तालुक्यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रात्रीच्या अंधारात विजेचे दिवे लावून काँक्रिट रस्ते करण्यात येत आहेत.असाच नाथाच्यावाडी येथील एका रस्त्याचा करेक्ट कार्यक्रम ठेकेदाराने राजरोसपणे केल्याने तालुक्यात या कामाची मोठी चर्चा चालू झाली आहे.
यवत कडून नाथाचीवाडीकडे राज्य मार्ग ०९ साठी रस्ता दरजोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेतीन किलोमीटर रस्त्याला जवळपास एक कोटी एक्यांशी लाखांचा आणि दुरुस्ती साठी बारा लाख साठ हजार रुपयांचा अधिक निधी दौंडचे कार्यसम्राट आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून मिळाला आहे.
जवळपास दुरुस्ती आणि मूळ रस्त्यांची रक्कम पाहता या रस्त्यासाठी सरकार दोन कोटी रुपये खर्च करीत असून ठेकेदार मात्र या विभागाच्या शाखा अभियंता यांच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.रस्त्याचे ३.२०० कि.मीचे खडीकरणाचे काम पूर्ण झाले असून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे नागरिकांचे मत आहे व उरलेल्या तीनशे मीटर रस्त्याचे पी.सी.सीचे व काँक्रीटिकरणाचे काम हे रात्रीच्या सुमारास केल्याने नागरिकांच्या मनात याबाबत शंका उपस्थित झाल्या असून नेमके रात्रीच्या वेळी ही पी.सी.सी आणि काँक्रेट करण्यामागचा ठेकेदाराचा अशुद्ध हेतू असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
या रस्त्याचे काम चौफुला परिसरातील कोकरे अँड कंपनीच्या या बड्या ठेकेदाराला मिळाले आहे.रात्रीच्या अंधारात उजेड करून काँक्रिटीकरणाचा रस्ता करण्याचा महाप्रताप या रस्त्याचे काम करणारे ठेकेदाराच्या कंपनीने केले आहे.या रस्त्याच्या कामकाजावरती लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अभियंता चेतन शिंदे यांची नेमणूक झालेली असून शिंदे हे पुणे येथील कार्यालयात सुद्धा सहजासहजी आढळून येत नाही.फिरतीच्या नावाखाली कायम गायब असणारे हे अधिकारी रात्रीच्या रस्त्यावर लक्ष कसे ठेवणार? हाच खरा कळीचा मुद्दा या निमित्ताने पुढे आलेला आहे.यामुळे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या या वागण्याने त्यांची आणि ठेकेदार यांची युती असावी अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे.मात्र या रस्त्याचे नियंत्रण असणारे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे ऑफिस पुणे शहरात असून दौंड तालुक्यातील हा प्रकार पुणे शहरात जाऊन सांगणे ही मोठी जिकिरीची बाब आहे आणि या विभागाचे अभियंता शिंदे यांनी या घटनेकडे सोईस्करपणे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे मत आहे.
तालुक्यातील नाथाचीवाडी येथील रात्रीचा केलेला काँक्रीट रस्ता हा गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय असला तरी परिसरातील लडकतवाडी,खुटबाव,पिंपळगाव या गावकऱ्यांना सुद्धा याचे आश्चर्य वाटू लागले आहे.
नाथाच्यावाडी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता या ठेकेदाराकडून गुणवंत होईल का? अशा स्वरूपाची खात्री मात्र नागरिक देत नाहीत ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने हा रस्ता बोगस होईल अशी शाश्वती मात्र ठामपणे ते सांगताना दिसत आहे.या काँक्रेटकरण रात्रीचे आणि खडीकरण केलेले काम काही ठिकाणी उखडले असल्याने रस्त्याबाबत नागरिक मोठ्या प्रमाणात आरडा-ओरड करू लागले असताना त्या रस्त्याची प्रामाणिक अधिकाऱ्याकडून चौकशी झाली पाहिजे असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
मुख्यमंत्री सडक योजनेतील हा रस्ता उत्कृष्ट आणि चांगल्या स्वरूपाचा व्हावा म्हणून नागरिकांमध्ये आशा असून ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने तो खराब होणार म्हणून त्याची निराशा वाढलेली आहे. या ठेकेदाराची रात्रीच्या कामाची चौकशी व्हावी अशा स्वरूपाची आता ओरड वाढली असून याकडे मुख्यमंत्री सडक योजनेचा विभाग लक्ष देईल का? हाच खरा प्रश्न नाथाचीवाडीतील नागरिकांसह परिसरातील नागरिकांना डोकेदुखीचा विषय ठरलेला आहे
या विभागाचे अभियंता शिंदे यांना रात्रीच्यावेळी काम करता येते का? याबाबत विचारणा केली असता तर,हो रात्रीच्या वेळी हे पि.सी.सी चे आणि काँक्रेटचे काम करता येते.गुणवत्ता बाबत त्यांना विचारले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळले.
-चेतन शिंदे.अभियंता,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना.
नाथाची वाडी येथील रस्त्याचे काम सुरू असून रात्रीच्या वेळी काँक्रीटकरन करण्यात आले आहे. यामध्ये रात्रीच्यावेळी कॉंक्रिटीकरण करण्यामागचा ठेकेदाराचा हेतू काय? दिवसा काँक्रीटकरन का केले नाही? नक्कीच हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. आत्ताच केलेले खडीकरण हे देखील उखडले आहे.त्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.भविष्यात रस्ता लवकरच खराब झाल्याशिवाय राहणार नाही. कॉंक्रिटीकरणाला देखील भेगा पडणार. बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित रस्ता बांधकामाची वेळी चौकशी झाली पाहिजे व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी.
– दिगंबर ठोंबरे युवा कार्यकर्ते नाथाचीवाडी.
ठेकेदाराच्या तोंडून आलेले शब्द
रस्त्यावर केलेले खडीकरण उखाडले असून रात्रीच्या वेळी पि.सी.सीचे कामाबाबत विचारणा केली असता ते काम रात्रीच्यावेळी करता येते, कार्यकर्ते? जरा त्यांची नावे मला व्हाट्सअपला पाठवा म्हणजे कोणाला काय अडचण असेल तर तिथं त्यांना आपण रस्त्यावर उभे करू आणि काय पाहिजे असेल तसे काम करून घेऊ त्यांच्याकडून.. भले उलट माझे दोन सुपरवायझर कमी करतो म्हणजे ती लोक काम करून घेतील.अशी अरेरावीची भाषा त्यांच्या तोंडून आली.
-विठ्ठल कोकरे ठेकेदार.