विश्वाच्या अफाट पसाऱ्यामध्ये जीवसृष्टी असणारा पृथ्वीसारखा आणखी एक ग्रह असून तेथे एलियन्स नावाची मानवाहून कितीतरी पटींनी अधिक प्रगत जमात राहात असल्याच्या कथा-भाकडकथा अनेक वर्षांपासून जगभरात चर्चिल्या जाताहेत. आइनस्टाइननंतर जगातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अंतराळ अभ्यासक स्टीफन हॉकिंगही सातत्याने एलियन्सशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, असे सांगितले जाते. अलीकडेच अमेरिकन संसदेच्या सुनावणीत, तीन माजी लष्करी अधिकाऱ्यांनी दावा केला की, अमेरिकेच्या ताब्यात एलियन आणि यूएफओ आहेत, ज्यांचे रिव्हर्स इंजिनिअरिंगचे गुप्त संशोधन चालू आहे. डेव्हिड ग्रुश या अमेरिकन माजी गुप्तचर अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार अमेरिकेकडे एलियन्सचे मृतदेह आहेत. या दाव्यांमुळे पुन्हा एकदा परग्रहवासियांच्या अस्तित्वाची चर्चा केंद्रस्थानी आली आहे.
अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा परग्रहवासियांचा म्हणजेच एलियन्सचा विषय कळीचा बनून पुढे आला आहे. ब्रह्मांडातील अगम्य अलौकिक प्रतिभेचा शोध घेऊन संरक्षण क्षेत्रातील आपले स्थान बळकट करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, याविषयीच्या अनेक मनोवेधक आणि उद्बोधक शोधकथा सध्या अमेरिकेत गाजत आहेत. अमेरिकेतील एच2 या दूरचित्रवाणी कंपनीने तर सर्च ऑफ एलियन्स नावाची एक स्वतंत्र मालिकाच चालवली आहे.
अमेरिकेतील रेडिओ केंद्रे, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून एलियन्स विषयीच्या माहितीचा इतका प्रचंड प्रमाणात भडीमार होतो आहे की त्यामुळे खुद्द अमेरिकेसह जगभरातील लोकांमध्ये याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. तसे पाहिल्यास हा विषय जुना नाही. 1947 पासून या विषयाभोवतीची गूढ वलये आणि लाटा एकानंतर एक पसरत गेल्या आहेत.
एलियन्स कुठे आहेत, ते कुठून येतात, ब्रह्मांडाच्या कोणत्या भागात आहेत, खरेच त्यांच्याभोवती अलौकिक प्रतिभेचे गूढ आहे का, पृथ्वीवरील मर्त्यमानवापेक्षा ते महाआधुनिक आणि प्रगाढ बुद्धिमान आहेत का, असे अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांमध्ये विचारले गेले आहेत. या अलौकिक प्रतिभेचा उपयोग करून अमेरिका स्वतःच्या संरक्षण सामर्थ्याचा, वैचारिक सामर्थ्याचा आणि जगावर प्रभुत्व वाढवण्याच्या भौतिक क्षमतेचा विस्तार करत आहे का, असे अनेक प्रश्न उभे आहेत.
1947 मध्ये अमेरिकन वर्तमानपत्रामध्ये एक प्रकरण गाजले. एका गुराख्याला एक ढिगारा दिसला आणि तो चमकू लागला. ते पाहून त्याला आग लागली आहे की काय असे वाटले. कारण पाच-सहा प्रकाशाचे पुंजके दिसत होते. त्यामुळे घाबरून जात त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पुढे पोलिसांनी तो सर्व मलबा हटवून लष्कराच्या स्वाधीन केला. त्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या.
कालांतराने या प्रकरणाबाबत अशी चर्चा होऊ लागली की, परग्रहावरून आलेल्या एका विमानाचा अपघात होऊन त्याचे तुकडे म्हणजे हा कचरा होता. ही चर्चा अधिक प्रमाणात होऊ लागल्यानंतर अमेरिकन सरकारने हवामानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या बलूनचा हा कचरा असल्याचे सांगत याविषयावर पडदा टाकला.
पुढील काळात या विमानातील तंत्रज्ञानाचा आणि योजनांचा तपशीलवार अभ्यास करून रिव्हर्स इंजिनिअरींगचे तंत्र अमेरिकन शास्त्रज्ञांनी वापरले असे म्हणतात. शीतयुद्धपूर्व काळात रशियामध्ये कोणती खलबते सुरू आहेत याचा शोध घेण्यासाठी गोपनीय हेरगिरी करणारे एक धाडसी विमान तयार करण्यात आले होते. या विमानाद्वारे रशियाच्या अंतर्गत भागात जाऊन शोध घेण्यात आला. अखेर हे विमान रशियाने पाडले. परंतु अमेरिकेने पुन्हा दुसरे विमान पाठवले.
हेरगिरीची ही लढाई सुरूच राहिली; पण अमेरिकेने हे गोपनीयतेचे तंत्र परग्रहावरील लोकांनी बनवलेल्या विमानापासूनच घेतले होते असे मानले जाते. अमेरिकेचे हे सर्व संशोधन एरिया 51 या भूभागात चालते. हा भाग पूर्णपणे वाळवंटी प्रदेश आहे. 2013 पर्यंत अमेरिका अशा पद्धतीची जागा अस्तित्वाच नाही, असा दावा करत होती. परंतु तेथे काही अपघात झाले तेव्हा त्यातील अपघातग्रस्तांनी न्यायालयात दाद मागितली आणि अखेर अमेरिकन सरकारने अशा प्रकारची जागा असल्याचे जाहीर केले. एरिया 51 ची नव्याने चर्चा सुरू झाली ती 1989 मध्ये.
रॉबर्ट लझार नावाच्या एका माणसाने असा दावा केला की अमेरिकेच्या एलियन्स आणि एलियन्स स्पेस क्राफ्टच्या सिक्रेट मिशनमध्ये मी सहभागी होतो. अर्थात त्याच्या या म्हणण्याला सीआयए आणि अमेरिकन लष्कराने दुजोरा दिला नाही. नेवाडामध्ये एका सुकलेल्या तलावावर वसलेल्या या क्षेत्राच्या सभोवती विजेच्या तारांचं कुंपण आहे. सीमेवर ठिकठिकाणी इशारा लिहिण्यात आला आहे, की तिथून आत येण्यास सक्त मनाई असून, तसा प्रयत्न जिवघेणा ठरू शकतो. अनेक ठिकाणी सशस्त्र सैनिकही तैनात करण्यात आले असून, त्यांचा पहारा 24 तास असतो. या क्षेत्राच्या वरून विमानालाही जाण्यास परवानगी नाही. 3.7 किलोमीटर क्षेत्रावर पसरलेली ही जागा अलीकडेच उपग्रहाच्या साहाय्याने पाहता येऊ लागली. त्यापूर्वी तसंही पाहता येत नव्हतं.
अमेरिकेच्या संसदेत काही दिवसांपूर्वी उडत्या तबकड्या म्हणजेच यूएफओ आणि एलियन्सबाबत सुनावणी पार पडली. यावेळी अमेरिकेच्या नौदलातील माजी अधिकारी मेजर (नि.) डेव्हिड ग्रश यांनी एक खळबळजनक दावा केला. त्यानुसार अमेरिका कित्येक वर्षांपासून एलियन्सबाबत माहिती लपवून ठेवत आहे. तसेच या यूएफओंचे रिव्हर्स इंजिनिअरिंग केले जात आहे. ग्रश हे 2022 सालापर्यंत अमेरिकेच्या डिफेन्स एजन्सीमधील यूएपी विभागात कार्यरत होते. हा विभाग यूएफओ संबंधित संदिग्ध घटनांबाबत तपास करतो. सरकारला 1930 साली एक उडती तबकडी मिळाली होती.
यासोबतच एक मृतदेह देखील मिळाला होता जो माणसाचा नव्हता. तेव्हापासूनच अमेरिकेने ही बाब जगापासून लपवून ठेवली आहे आणि या गोष्टींवर रिसर्च सुरू आहे, असे ग्रश यांनी म्हटले आहे. यापूर्वी एका माजी लष्करी अधिकाऱ्याने एरिया 51 मध्ये एका रॉडच्या आधारे एलियन्सबाबत संगणक प्रयोगशाळेत संशोधन केले आणि त्याच्याशी बातचीतही केल्याचे म्हटले होते. या एलियनला जेरॉड असे नाव दिले होते. यामुळे परग्रहावरील माणसांशी अमेरिकन संशोधक बातचीत करतात, त्यांची गोपनीय माहिती मिळवतात आणि त्याआधारे संशोधनाच्या क्षेत्रात आपले प्रभुत्व गाजवण्यासाठी अनेक गुपिते तयार करतात यांसारख्या दाव्यांना बळकटी मिळत गेली.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनाही या गोपनीय मिशनची कल्पना होती, असे एका वृत्तपत्रात म्हटले होते. तसेच “ट्रम्प ऑन एलियन्स’ या नावाची एक कथाही छापून आली होती; पण ट्रम्प यांनी याबाबत कानावर हात ठेवले. ट्रम्प एलियन्सविषयी बोलतील असे जाहीरही झाले; पण पुढे अमेरिकन संरक्षण विभागाने त्यांना असे करण्यास नकार दिल्यामुळे ट्रम्प यांनी याबाबत कानावर हात ठेवले. यादरम्यान एरिया 51 मध्ये एलियन्सवर संशोधन करताना मरण पावलेल्या दोन जणांच्या जनुकांवर संशोधन केले असता त्यांच्या शरीरात आढळलेले दोन विषाणू भूतलावरील माणसांमध्ये आढळत नसल्याचे सांगण्यात आले. परंतु नंतरच्या काळात अनेक शास्त्रज्ञांनी हे दावेही खोडून काढले.
वास्तविक, अमेरिकेच्या पेंटागॉन टास्क फोर्सने यूएफओवर केलेल्या अभ्यासातून एलियन असण्याचा कसलाही पुरावा किंवा डेटा मिळाला नसल्याचे जाहीर केले. 2020 मध्ये अमेरिकेत अनआयडेंटिफाइड एरियल फिनॉमिना टास्क फोर्स नावाचा एक प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या टास्क फोर्सने 2021 मध्ये दिलेल्या अहवालात 144 यूएफओवर स्टडी केल्यानंतर कोणताही ठोस पुरावा आढळला नाही असे नमूद केले गेले; पण एलियन्सची शक्यता पूर्णपणे फेटाळली नाही.
इस्रायल स्पेस सिक्युरिटीचे माजी प्रमुख हैम एशेद यांनीही दावा केला आहे की, अमेरिका एलियनशी संबंधित माहिती लपवत आहे. 2020 मध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यांनी केलेला दावा अधिक धक्कादायक होता. त्यानुसार पृथ्वीवर एलियन आले आहेत. पण, स्वतःची ओळख जगासमोर यावी, असे त्यांना वाटत नाही. ते म्हणतात की, मानव हे सत्य स्वीकारायला अजून तयार नाही. एलियन्सने आपली ओळख उघड न करण्याचा अमेरिकेशी करार केला आहे. एलियन्स इथे फक्त प्रयोगांसाठी आले आहेत. ते विश्वाची जडणघडणही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अमेरिकन गुप्तचर अधिकारी ग्रुश यांच्या एशेद यांच्याशी झालेल्या चर्चेला डोनाल्ड ट्रम्प यांनी एलियन्सवर दिलेल्या मुलाखतीवरूनही काही प्रमाणात पुष्टी मिळते. त्यात ते म्हणाले होते की, “राष्ट्रपती म्हणून मला एलियन्सबद्दल जे काही कळले ते मी माझ्या कुटुंबियांनाही सांगणार नाही. पण ते काहीही असले तरी ते खूप मनोरंजक आहे. अल्बर्ट आइनस्टाइननंतर जगातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अंतराळ अभ्यासक स्टीफन हॉकिंग हेही सातत्याने एलियन्सशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, असे सांगितले जाते.
या सर्व विवेचनाचे सार असे की, विश्वाच्या अफाट पसाऱ्यात पृथ्वीसारखा जीवसृष्टी असणारा ग्रह अस्तित्वात असूही शकतो; पण अद्यापपर्यंत तिथवर मानवाला पोहोचता आलेले नाही. आज ज्या काही चर्चा होताहेत त्या दाव्यांवर आधारित आहेत. त्याबाबत सबळ पुरावा समोर आणला जात नाही तोपर्यंत एलियन्सच्या अस्तित्वासंदर्भातील दाव्यांना अधिमान्यता मिळणार नाही. अमेरिकन स्पेस एजन्सीच्या स्पेस रिसर्च सेंटर जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या एका अहवालानुसार, या शतकाच्या शेवटी मानव ज्युपिटर किंवा शनी या ग्रहाच्या कमीत कमी एका उपग्रहावर आपले पाऊल ठेवेल. सन 2383 च्या आसपास मनुष्य सोलर सिस्टीमच्या बाहेर असलेल्या एखाद्या एलियन प्रजातीच्या संपर्कात येऊ शकतो. तोवर एलियन्सभोवती असणारे गूढवलय असेच कायम राहणार आहे आणि त्यासंदर्भातील दाव्यांमुळे या विषयाची चर्चा होत राहणार आहे.
– कैवल्य धारुरकर