पुणे – पुणे शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते तसेच उपनगरांतील सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे असल्याने याचा थेट ताण वाहनाच्या शॉकऍब्सॉर्बरसह वाहनचालकांच्या मणक्यावरही येत आहे. दुचाकींच्या शॉकऍब्सॉर्बरची मागणी गेल्या एका महिन्यांत तिप्पट ते चौपट वाढली असल्याचे तसेच ऑरिजनल शॉकऍब्सॉर्बरचा बाजारपेठेत तुटवडा असल्याचे स्पेअरपार्ट विक्रेते सांगत आहेत.
पुणे शहर, उपनगरांतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाल्याने मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखीचा त्रास उद्भवणाऱ्या वाहनचालकांची (रुग्ण) संख्या वाढली आहे. खड्ड्यातून वाहन आदळत असल्याने त्याचा परिणाम मणक्यावर होत आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे शॉकऍब्सॉर्बर बदलणे तसेच ती दुरूस्त करून घेणाऱ्या वाहनचालकांची संख्या गेल्या महिनाभरात वाढली आहे. विशेषत: शॉकऍब्सॉर्बर खराब होणाऱ्या वाहनांत दुचाकीचे प्रमाण अधिक आहे.
बाइक आणि मोपेड (स्कुटर) याप्रकारात बाइकचे पुढील शॉकऍब्सॉर्बर खराब होण्याचे तर इंजिनचा भर मोपेडच्या मागील शॉकऍब्सॉर्बर असल्याने मोपेडचा मागील शॉकऍब्सॉर्बर खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. गॅरेजमध्ये वाहन दुरूस्तीसाठी नेल्यास गॅरजवाले शॉकऍब्सॉर्बर नवे टाकण्याचा सल्ला देत असले तरी त्यामध्ये ओरिजनल आणि डुब्लीकेट असे प्रकार असल्याने ते दुरूस्ती करून घेण्याकडे वाहनचालकांचा कल अधिक आहे. याशिवाय मागणी वाढल्याने ओरिजनल शॉकऍब्सॉर्बरचा बाजारपेठेत तुटवडा असल्याचे मेकॅनिक सांगतात.
चारचाकीसाठीचा खर्च मोठा
खड्ड्यांमुळे चारचाकीचे पुढील शॉकऍब्सॉर्बर खराब होण्याची प्रमाणे अधिक आहे. मागील शॉकऍब्सॉर्बर शक्यतो लवकर ( किमान एक लाख कि.मी.) खराब होत नाहीत. पुढील शॉकऍब्सॉर्बर दुरुस्तीचा खर्च 5000 ते 8,000 रुपयांपर्यंत असल्याचे हडपसर येथील सर्वांत जुने 1979 पासून शॉकऍब्सॉर्बर दुरुस्तीचे काम करीत असलेले “भाग्यलक्ष्मी’मधील मॅकेनिकने सांगितले.
मोपेडचे शॉकऍब्सॉर्बर नवे खर्च
पुढील : 1000 रुपये ते 2000 रुपये
मागील : 2000 रुपये ते 2500 रुपये
बाइकचे शॉकऍब्सॉर्बर दुरुस्तीचा खर्च
पुढील : 1000 रुपये ते 2000 रुपये
मागील : 600 रुपये ते 1200 रुपये
- मोपेडचे पुढील शॉकऍब्सॉर्बर दुरूस्त होत नाहीत ते नवे टाकावे लागतात.
- मोपेडचे मागीलशॉकऍब्सॉर्बर दुरूस्तीचा खर्च 600 ते 1000 रुपये आहे.
- चाक आउट काढण्याचा खर्च 300 ते 1000 रुपये आहे.
(दुरुस्तीचा खर्च दुचाकीच्या प्रकारानुसार कमी अधिक होतो)