पुसेगाव – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बागायती क्षेत्र असलेल्या वर्णे, निगडी तर्फ देवकरवाडी येथील शेतकऱ्यांच्या नशिबी आलेले औद्योगिक वसाहतीचे शिक्के आता सातबाऱ्यावरुन कायमस्वरुपी हद्दपार होणार आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा निर्णय घेतला असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वर्णे, निगडी तर्फ देवकरवाडी येथील ग्रामस्थांचा शेती हाच पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीवरच संपूर्ण कुटूंब अवलबूंन असताना राज्य शासनाने अचानकरित्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर औद्योगिक परिक्षेत्रासाठी अधिग्रहीत असे थेट शिक्केच मारले आणि शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली. मुळातच वर्णे व निगडी तर्फ देवकरवाडी परिसरापासून सातारा औद्योगिक वसाहत व अतिरिक्त औद्योगिक वसाहत जवळ असताना जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा हेतूने राजकीय शक्तींनी शेतकऱ्यांच्या सातबारावर अधिग्रहणाचे शिक्के मारल्याने शेतकरी चिंतेत होते.
आमदार महेश शिंदे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये या विषयावर प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर अधिवेशन काळातच विधानभवनातील कार्यालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांसमवेत भेट घेऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्यावर मंत्री सामंत यांनी सकारात्मक भुमिका घेऊन तातडीने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, तात्काळ शिक्के उठविण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध आहे. एकाही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. वर्णे, निगडी तर्फ देवकरवाडी येथील शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीबाबतचे शिक्के सातबारा उताऱ्यावर मारले असल्याचे निदर्शनास आणून दिले. मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाला कोणत्याही पद्धतीचा विरोध नाही, मात्र बागायती जमिनी घेऊन औद्योगिक विकास करणे अयोग्य होणार असल्याने तातडीने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.
विधीमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारकडून म्हणणे जाणून घेतले आणि तातडीने शिक्के उठविण्याची कार्यवाही करण्याबाबतचा शब्द घेतला होता. शेतकऱ्यांसमवेत उद्योग मंत्र्यांशी बैठक होऊन हा विषय कायमस्वरुपी संपविला असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.