पुणे – इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये बुधवारी साथीयन ज्ञानसेकरन याने अनुभवी अचंता शरत कमलवर दणदणीत विजय मिळवला. दबंग दिल्ली टीटीसीने 9-6 अशा फरकाने गतविजेत्या चेन्नई लायन्सचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिल्ली फ्रॅंचायझीने 42 गुणांसह अंतिम 4 संघांमध्ये जागा पक्की केली, तर चेन्नई लायन्सने 41 गुणांसह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
साथीयनने 3-0 अशा फरकाने शरतचा पराभव करून आघाडी मिळवून दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू प्रत्येक गुण मिळवण्यासाठी आपला अनुभव पणाला लावताना दिसले. शरतने सुरुवात चांगली केली; परंतु साथीयनने दुसऱ्या गेममध्येही आपल्या आक्रमक खेळाने 11-3 अशी बाजी मारली. तिसऱ्या गेममध्ये साथीयनने 11-6 अशा विजयासह हा सामना जिंकला. महिला एकेरीतील लढतीत यांग्झी लियू हिने श्रीजा अकुला हिच्यावर 2-1 असा विजय मिळवला. पहिला गेम 11-8 असा जिंकून लियूने आघाडी घेतली तरी श्रीजाने खेळ उंचावत बरोबरी साधली.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये यांग्झी हिने 11-8 अशा फरकासह विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या सामन्यात साथीयन व बार्बोरा बालाझोव्हा या जोडीने मिश्र दुहेरीत शरत व यांग्झी यांचा 2-1 असा पराभव करून आघाडी वाढवली. साथीयन व बार्बोराने पहिले दोन गेम 11-7, 11-6 अशा फरकाने जिंकले; परंतु तिसऱ्या गेममध्ये शरत व यांग्झी यांनी 11-7 अशी बाजी मारली. बेनेडिक्ट डुडाने 2-1 अशा फरकाने जॉन पेर्सेनचा पराभव करून आव्हान कायम राखले होते. डुडाने 8-11, 11-6, 11-7 असा हा सामना जिंकला. महिला एकेरीच्या लढतीत बार्बोराने 2-1 ( 11-6, 4-11, 11-9) असा प्राप्ती सेनवर विजय मिळवून दबंग दिल्लीला बाजी मारून दिली.
निकाल
चेन्नई लायन्स 6-9 दबंग दिल्ली टीटीसी
शरत कमल 0-3 साथीयन (10-11, 3-11, 6-11)
यांग्झी लियू 2-1 श्रीजा अकुला ( 11-8, 8-11, 11-8)
शरत/यांग्झी 1-2 साथीयन/बार्बोरा ( 7-11, 6-11, 11-7)
बेनेडिक्ट डुडा 2-1 जॉन पेर्सन ( 8-11, 11-6, 11-7)
प्राप्ती सेन 1-2 बार्बोरा ( 11-6, 4-11, 11-9)