पुणे – टाटा ऑटोकॉम्प आंतरशालेय लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत लॉयला प्रशाला संघाने बुधवारी दोन गटातून, तर हॅचिंग्जने एका गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. लॉयला स्कुलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन लॉयला प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले आहे. लॉयला प्रशाला संघाने 12 आणि 14 वर्षांखालील गटातून उपांत्य फेरी गाठली. हॅचिंग्जने 14 वर्षांखालील गटात आपली आगेकूच कायम राखली.
लॉयला प्रशाला संघाने आरव इंगळे (32 वे मिनिट) आणि शौन आंग्रे (40 वे मिनिट) यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर विद्या व्हॅली प्रशालेच्या संघाचा 2-0 असा पराभव केला. या गटातून यापूर्वी सेंट व्हिन्सेंट, हॅचिंग्ज आणि बिशप्स प्रशाला संघांनी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. लॉयला प्रशाला संघाने 14 वर्षांखालील गटात विद्या व्हॅली प्रशालेचाच 3-0 असा सहज पराभव केला.
लॉयलाकडून डीन ऍन्थोनी, खारांशु गजरे, आयुष चव्हाण यांनी गोल केले. हॅचिंग्जने 14 वर्षांखालील गटात कल्याणी प्रशालेचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. कल्याणी प्रशालेने आर्यन मुळ्येच्या 30 व्या मिनिटाच्या गोलने महत्वपूर्ण आघाडी मिळवली होती. मात्र, त्यानंतर परम राठोडच्या (38 वे, 43 वे मिनिट) दोन आणि काश्विक गवळीच्या (50 वे मिनिट) गोलने हॅचिंग्जने सोपा विजय मिळवला.
निकाल (बाद फेरी) –
12 वर्षांखालील – लॉयला प्रशाला 2 (आरव इंगळे 32 वे मिनिट, शौन आंग्रे 40 वे मिनिट) वि. वि. विद्या व्हॅली 0. 14 वर्षांखालील – लॉयला प्रशाला 3 (डीन ऍन्थोनी 11 वे मिनिट, खारांशु गजरे 25 वे मिनिट, आयुष चव्हाण 49 वे मिनिट) वि. वि. विद्या व्हॅली 0.