मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यात कंटेनर आणि प्रवासी वाहतूक जीपचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात जीपमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. काळी पिवळी प्रवासी जीपला भरधाव येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने प्रवासी जीप साठ फूट दूर फेकली गेली. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर खडवली फाट्याजवळ हा अपघात झाला असून ही प्रवासी जीप खडवली स्टेशनच्या दिशेने जात होती. जीपमध्ये काही विद्यार्थी देखील होते. खडवली फाट्यावर क्रॉसिंगजवळ वळण घेत असताना मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने जीपला जोरदार धडक दिली. यात प्रवासी जीप जवळपास 50 ते 60 फूट दूर फेकली गेली असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
अपघातात जीपमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी जीप चालक अतिशय गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी कळव्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित तीन जणांवर निधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत. तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. खडवली फाटा हा अपघाताचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे प्रशासानाने लवकरात लवकर उपाय करावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.