सत्तानाट्यानंतर जलसंधारणाच्या कामासाठी 50 कोटी : आमदार दत्तात्रय भरणे यांचे प्रयत्न यशस्वी
इंदापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती अर्थ विभागाच्या चावी येताच इंदापूर तालुक्यातील स्थगित कामांना 50 कोटींचा निधी मंजूर झाल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुरवा यशस्वी ठरला आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना निधीच्या बाबतीमध्ये इंदापूर तालुका उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून दर आठवड्याला कोटींच्या कोटी उड्डाणे घेत होता; परंतु अचानक एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत भाजपशी घरोबा करत महायुतीचे सरकार स्थापन केले आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाला ब्रेक लागला.
खरे तर भरणे राज्यमंत्री असताना विकासकामांमध्ये कधीही भेदभाव न करता सरसकट निधी मंजूर करत होते; परंतु शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचे धोरण राबविल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली होती याचा फार मोठा फटका इंदापूर तालुक्याला बसला होता. इंदापूर तालुक्यातील विकासकामांची स्थगिती उठविण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांचा अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता; परंतु यामध्ये यश मिळाले नाही.
गेल्या पंधरवड्यामध्ये मात्र राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलून अजित पवार हे सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आल्या आहेत. इकडे अजित पवार सत्तेत सहभागी होताच आमदार दत्तात्रय भरणे कमालीचे गतिमान झाले असून पहिल्या झटक्यात त्यांनी जलसंधारण विभागाच्या जवळपास 50 कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती उठविण्यामध्ये यश मिळवले आह्े.तसेच येणाऱ्या काळात ते उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांची घौडदौड पूर्वीसारखी चालू ठेवतील. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.