भुवनेश्वर : घरात मुलीचा जन्म झाला म्हणजे घरात लक्ष्मी आल्याचे म्हटले जाते. घरात मुलगी येण्याने आनंदाचे वातावरण असते पण ओडिशामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे, आपल्या लेकीचा सांभाळ करू शकत नाही म्हणत जन्मदात्या आईनेच ९ महिन्याच्या चिमुकलीला फक्त ८०० रुपयात विकल्याचे धक्कादायक घटना घडली आहे.
ओडिशामधील मयूरभंज जिल्ह्यातल्या माहुलिया गावातील या महिलेने आपली मुलगी बिपारचरणपूर गावातील एका दाम्पत्याला महिन्याभरापूर्वी विकले. या महिलेचा पती तामिळनाडूला गेला असताना या महिलेने परस्पर आपली मुलगी विकून टाकल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या महिलेचा पती तामिळनाडूवरून परत आल्यावर त्याला हा प्रकार समजला. त्याने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली. बेपत्ता झालेल्या मुलीच्या तपासादरम्यान महिलेने आपली मुलगी विकून टाकल्याचे मान्य केले. मुलीचा सांभाळ करणे अवघड जात असल्याने मुलगी विकून टाकण्याचा निर्णय आपण घेतल्याचे तिने सांगितले.
आपल्याला अपत्य नसल्यामुळे आपण ही मुलगी खरेदी केल्याचे मुलीची खरेदी करणाऱ्या दाम्पत्याने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीची आई, खरेदी करणारे दाम्प्6य आणि एक मध्यस्थ अशा चार जणांना अटक केली आहे. वक्री झालेल्या मुलीला बाल कल्याण कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे.