मुंबई – अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये बंडखोरी करत भाजपला साथ दिली आहे. याशिवाय त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का दिला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील आठ आमदारांनीही मंत्रिपदाचीही शपथ घेतली आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत देखील फुट पडल्याने हे फोडाफोडीचे राजकारण भाजप करत असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून म्हंटले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात मात्र रोहित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे पहायाला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आर.आर.आबा यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
रोहित पवारांनी शेअर केलेला हा व्हिडीओ दहा वर्षांपूर्वीचा आहे. त्यात आर.आर. पाटील यांनी भाजपवर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. “ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, आज त्यांना सन्मानाने भाजपमध्ये घेतले जात आहे. भाजपला मी विचारू इच्छितो की तुम्ही आजपर्यंत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, असं कोणतं तीर्थ यांच्यावर शिंपडलं अन् हे पवित्र झाले? राज्यामध्ये आयाराम गयाराम संस्कृतीला खत घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. हा आजपर्यंत म्हणजे साधुसंतांचा पक्ष असा दावा भाजपाचे लोक करत होते. अलिकडच्या काळात भाजपचा पक्ष साधुसंतांचा पक्ष नाही, संधीसांधूंचा पक्ष आहे. आज एवढ्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दाल मे काला असं म्हटलं जातं, पण आता काले मे दाल अशी भाजपची अवस्था झाली आहे,” असे आर.आर. पाटील त्यांच्या भाषणात म्हणत आहेत.
स्व. आर. आर. पाटील (आबा) यांनी दहा वर्षांपूर्वी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अद्यापही बाकी आहे… pic.twitter.com/7SZoAaZqjC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 5, 2023
हा व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी ‘स्व. आर. आर. पाटील (आबा) यांनी दहा वर्षांपूर्वी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अद्यापही बाकी आहे…’ असे लिहिले आहे. आर.आर. पाटील यांचे हे १० वर्षापूर्वीचे भाषण आजच्या परिस्थितीशी जुळणारे असल्याचे म्हंटले जात आहे. दरम्यान दुसरीकडे, राष्ट्रवादीत पक्षात दोन गट पडल्यानतंर अजित पवार यांना जास्त आमदारांच समर्थन मिळाल्याचे स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत, तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे.