आळंदी –
सोहळा जमला आषाढी वारीचा ।
सण भक्तीचा आज आला पंढरीचा ।।
मेळा जमला भक्तगणांचा ।
ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा ।।
आज देवशयनी आषाढी एकादशी असल्याने अलंकापुरी नगरीमध्ये माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच लाखो भाविकांनी गर्दी केली होती. भल्या पहाटेच इंद्रायणी घाटावर पवित्र असे स्नान करण्यासाठी भाविक एकवटले होते. संपूर्ण दिवसभर माऊली मंदिरात भक्तीचा मळा फुलून ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा तुकाराम असा गजर दर्शन बारीमध्ये सुरू होता.
इंद्रायणी घाट व माऊली मंदिर परिसरात हार, फुले, पूजेचे साहित्य, वारकरी साहित्य व इतर विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. त्यामुळे भाविक देखील दर्शनानंतर या बाजारपेठेतील वस्तू खरेदीसाठी गर्दी करताना दिसत होते. एकादशीनिमित्त संपूर्ण माऊली मंदिर परिसर गाभारा व इतर देवतांची मंदिरातील देवालयात विविध आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. र्वीीछरराजाची हजेरी संपूर्ण दिवसभर सुरू असल्याने भाविकही समाधान व्यक्त करीत होते.
मंदिरामध्ये पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यापासून मोझे यांचे वतीने संपूर्ण महिनाभर कीर्तन सेवा सुरू आहे. गुरुवारी (दि. 29) माऊलींचा वार शवयनी आषाढी एकादशीनिमित्त प्रथा परंपरेप्रमाणे सायंकाळी पाच वाजता माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी निघाली होती. यावेळी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत आळंदीकर यांच्यावतीने करण्यात येत होते.
दरम्यान, ग्रामस्थ व खांदेकरी तसेच भाविक या नगरप्रदक्षिणात सहभागी होऊन भक्तीरसात अगदी तल्लीन झाले होते. पीएमपीएमएलची पालिकेची सेवा सुरळीत सुरू होती खाजगी वाहनांची देखील सेवा सुरू होती आळंदी दिघी पोलीस स्टेशन यांचे वतीने वाहतूक व नियोजन योग्य प्रकारे होत असल्याचे दिसून आले. आळंदीत येणारे भाविक माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर श्रीक्षेत्र देहू, येथील गजानन महाराज, साई, थोरले पादुका, बालाजी मंदिर व इतर देवदेवतांना भेटी देताना दिसत होते.
माऊली मंदिरात खिचडीचे वाटप
राहुल चव्हाण परिवाराचा उपक्रम
आळंदी – देवशयनी आषाढी एकादशी निमित्त युवा कार्यकर्ते राहुल चव्हाण परिवाराकडून माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुमारे 50 किलो खिचडीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आळंदी शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, साईनाथ ताम्हणे, हिरामण तळेकर, विनोद गायकवाड, मयूर कुऱ्हाडे, उदय महाराज अडवळे, शुभम ताम्हणे, पंकज पाखरे, अविनाश राळे, दिनेश कुर्हाडे, अनिल जोगदंड, ज्ञानेश्वर घुंडरे, अर्जुन मेदनकर, बाबुराव मोरे, महादेव पाखरे, सचिन शिंदे व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी या खिचडी वाटप कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान,खिचडी वाटपानंतर सर्वांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आळंदी देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी मोलाचे सहकार्य यावेळी केले.