मुंबई – अभिनेता रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली. नुकतेच झालेल्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स ‘आयफा’ 2023 मध्ये वेड चित्रपटाने बाजी मारली होती. प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या मराठी चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर आता या चित्रपटाची अभिनेत्री क्रिती सेनॉनला देखील भुरळ पडली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रितेशचे कौतुक केले आहे.
वेड चित्रपटातील एक फोटो इनस्टाग्राम स्टोरीला शेअर करत क्रितीने लिहिले की, “चित्रपट पाहण्यासाठी मला खूप उशीर झाला. पण मला ‘वेड’ चित्रपट खूप आवडला. मित्रा, रितेश हा चित्रपट तू उत्तम दिग्दर्शित केला आहे. अभिनय, चित्रपटातील दृश्ये सर्वच उत्तम आहे. तू आणि जिनिलीया प्रेम आहात. असंच काम करत राहा.” असे म्हणत तिने दोघांना शुभेच्छा दिल्या. ही पोस्ट शेअर केल्यानंतर जिनिलीयाने क्रितीचे आभार मानले.
दरम्यान, रितेशने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ या चित्रपटातून जेनिलियाने चित्रपटसृष्टीत पुन्हा पदार्पण केले. रितेश-जेनेलिया ही खऱ्या आयुष्यातील जोडी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. 30 डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने 70 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.