पिंपरी – लवकरच दोन हजारांची नोट चलनात बाहेर होत आहे. तोपर्यंत या नोटेचाही व्यवसाय होत असल्याचे दिसून येत आहे. बहुतेक व्यावसायिक थेट नकार देत आहेत तर काही अतिरिक्त चार्ज आकारत आहेत. काही पेट्रोल पंपावर नोट घेतली तरी दिड हजार रुपयांचे पेट्रोल, डीझेल आणि वर शंभर रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत. याचबरोबर अनेक किराणा दुकानदार, मोबाइल दुकानदार, डॉक्टरही दोन हजार रूपयांच्या नोटा घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची विशेषत महिलांचा आणि मजूर वर्गाची कोंडी झाली आहे.
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने 19 मे रोजी दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा नोटबंदीसाठी परिस्थिती निर्माण होते की काय? अशी शंका होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बाजारात दोन हजार रूपयांच्या नोटांचे प्रमाण अतिशय कमी होते. एखादा मोठा व्यवहार झाला तरच दोन हजार रूपयांच्या नोटा निदर्शास येत होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे दोन हजार रूपयांच्या 5 ते 10 नोटांपेक्षा अधिक नोटा नसल्याचेही समोर आले आहे.
अनेक पंपावर दोन हजार रुपयांची नोट घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. पूर्वी अनेकदा नागरिक हव्या त्या रकमेचे पेट्रोल भरत होते. त्यानंतर उरलेले पैसे पंपचालक परत करत होते. मात्र, हा निर्णय जाहीर झाल्यानंतर या नोटाच घेण्यात येत नाहीत. तसेच, पेट्रोल भरण्यापूर्वी आधीच नोट घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांची कोंडी होत आहे. विशेत: दुचाकीचालक अनेकदा 200 ते 500 रुपयांचे पेट्रोल भरतात. अशा वेळी ही नोट स्वीकारली जात नाही.
बदलण्यास मोठी रांग
बॅंकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची तसेच खात्यात जमा करण्याची सोय उपलब्ध आहे. परंतु बॅंकांमध्ये रक्कम खात्यात जमा करण्याऐवजी बदलून घेण्यावर भर दिसत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बहुतेक बॅंकांमध्ये मोठी रांग दिसत आहे. यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक खात्यात जमा करण्यावर भर देत आहेत.
पेट्रोल पंपांवरील फलक
पेट्रोल भरण्यास दोन हजार रूपयांची नोट देणार असाल तर कमीत-कमी एक हजार ते दिड हजार रूपयांचे पेट्रोल भरा, अशा आशयाचे फलक शहर आणि परिसरातील पेट्रोल पंपावर लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना गरज नसताना जास्त रक्कमेचे पेट्रोल टाकावे लागत आहे.