सीडनी – ऑस्ट्रेलियात “वॉर हिरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैन्यदलातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने युद्ध गुन्हे केल्याचे सिद्ध झाले आहे, असे ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये या प्रसिद्ध लष्करी अधिकाऱ्याने युद्धगुन्हे केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
बेन रॉबर्टस स्मिथ असे या लष्करी अधिकाऱ्याचे नाव असून त्यांना युद्धकाळातील अतुलनीय कामगिरीसाठी मानाच्या “व्हिक्टोरिया क्रॉस’ने सन्मानित करण्यात आले आहे. प्रसिद्धी माध्यमांकडून आपली बदनामी केली जात असल्याचा स्मिथ यांनी केलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
बेन रॉबर्टस स्मिथ यांनी अफगाणिस्तानमध्ये अनेक युद्धगुन्हे केले असल्याचा दावा करणारा एक लेख 2018 मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यातील तपशील”सत्य’ असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
रॉबर्टस-स्मिथ हे स्पेशल एअर सर्व्हिस रेजिमेंट कॉर्पोरलमधील माजी अधिकारी असून ते आता एका मीडिया कंपनीचे एक्झिक्युटिव्ह आहेत. त्यांना अफगाणिस्तानमधील युद्धातील कामगिरीसाठी “मेडल ऑफ गॅलंटरी’ने गौरवण्यात आले होते. त्यांनी 2009 मध्ये अफगाणिस्तानमध्ये असताना एक कृत्रिम पाय असलेल्या अपंग कैद्याला पाठीत मशिनगनच्या गोळ्या मारून ठार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
एवढेच नव्ह तर या कैद्याचा कृत्रिम पाय त्यांनी बीअरचे भांडे म्हणून बाळगला होता. 2012 मध्ये हातकड्या घातलेल्या एका शेतकऱ्याला त्यांनी लाथेने तुडवलले होते. तर त्यांच्या सहकाऱ्यांनी या शेतकऱ्याला गोळ्या घालून ठार केले होते. रॉबर्ट्स यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप देखील होते. मात्र ते सिद्ध होऊ शकले नाहीत. ते बदनामीसाठी केले गेल्याचे मानण्यात आले.