जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीच्या विकासाच्या शिल्पकार राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गडकोट पायरीमार्गावर असलेल्या पूर्णआकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत, भंडारा उधळण व अभिवादन करत जेजुरीतील समस्त ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलन व साखळी उपोषणाचा सहावा दिवस साजरा केला.
मार्तंड देवसंस्थान समितीवर 19 मे 2023 रोजी पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी सात विश्वस्तांची निवड केली. न्यासाच्या घटनेच्या परिच्छेद 10 नुसार जरी ही निवड असली तरी (महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व धर्माने हिंदू असलेली स्त्री किंवा पुरुष या पदासाठी अर्ज करू शकते व धर्मदाय आयुक्त त्यांना योग्य व पात्र उमेदवारांची विश्वस्तपदी निवड करू शकतात) यामध्ये जेजुरी व पंचक्रोशीतील केवळ दोनच सदस्य निवडले गेले.
त्यात एकही महिला सदस्य नसल्याने व पाचजण बाहेरील गावचे रहिवासी असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या निवड प्रक्रिये विरोधात रास्ता रोको, पदयात्रा, निषेधसभा यांचे आयोजन करीत ग्रामस्थांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची काही ग्रामस्थांनी भेट घेतली तर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेत जेजुरीकर ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून यातून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
मंगळवारी (दि.30) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ,धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांचीही भेट घेत निवेदन देण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला 4जूनला भेटण्याची व चर्चा करण्याची वेळ दिली आहे. सध्याच्या विश्वस्त मंडळामध्ये नवनियुक्त झालेले पाच विश्वस्त बाहेरगावातील आहेत. यामध्ये काहीजण सत्ताधारी पक्षाशी निगडित आहेत. निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचे निदर्शनाला येत आहे.
विशेषतः एका सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असलेल्या विश्वस्तावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ही निवड प्रक्रिया रद्द करावी. बाहेरील विश्वस्त न नेमता स्थानिकांना प्राधान्य द्यावे. निवडीमध्ये किमान दोन महिला असाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार जेजुरीवासीयांचा आहे. तसेच उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
त्यानुसार पाच सदस्य वाढवावेत
या निवड प्रक्रियेला बाधा न आणता देवसंस्थांनवर स्थानिक ग्रामस्थांमधील दोन महिला व तीन पुरुषांची निवड धर्मादाय आयुक्त कार्यालयाने करावी. निवड झाल्यानंतर तसा ठराव पारित करण्याच्या सूचना विश्वस्त मंडळास कराव्यात व त्यानंतर घटना दुरुस्ती होऊन किमान 60 टक्के विश्वस्त स्थानिकांमधून निवडले जावेत. सध्यातरी योग्य तो निर्णय घेऊन जेजुरीकरांच्या मागणीला न्याय द्यावा, अशी मागणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे करणार असल्याचे काही प्रतिनिधींनी बोलून दाखवले.