पुणे – राज्यातील महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पाच दिवसांत 90 हजार 121 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. 41 हजार 12 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरुन अर्ज लॉकही केलेले आहेत.
राज्यातील पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आदी महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धत राबविण्यात येत असते. प्रवेशासाठी 25 मेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर उपलब्ध आहे. राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी 1 हजार 664 कनिष्ठ महाविद्यालये उपलब्ध आहेत. यात 90 हजारांवर विद्यार्थ्यांची नोंदणी झाली.
यातील निम्म्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरुन अर्ज लॉकही केला आहे. 17 हजार 90 विद्यार्थ्यांचे अर्ज ऍटो व्हेरीफाईडही झालेले आहेत. मार्गदर्शन केंद्राद्वारे 9 हजार 66 अर्जांची पडताळणी करण्यात आली. 80 अर्ज मागे घेण्यात आले आहेत. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 319 कनिष्ठ महाविद्यालयातील 23610 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून 11585 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 1 भरला आहे.