पुणे – मार्च महिन्यात सुरू केलेली नाले, पावसाळी लाईन तसेच चेंबरच्या सफाईची कामे 31 मेपर्यंत 100 टक्के पूर्ण करण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, महापालिकेचा दावा फोल ठरला असून शहरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी, अद्याप केवळ 62 टक्केच नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामे 20 जूनपर्यंत पूर्ण होतील, असा नवा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे.
त्यामुळे, यंदाही नालेसफाईचा खर्च पाण्यात जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, नागरिकांना आपल्या भागात नालेसफाई झालेली नसल्यास त्याची माहिती थेट अधिकाऱ्यांना देता यावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त महेश पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांचे मोबाईल क्रमांक महापालिकेने जाहीर केले असून नागरिकांना त्यावर व्हॉट्सअपवरून लोकेशनसह फोटो पाठविता येणार आहेत.
मार्च महिन्यात सुरू केले काम
महापालिका आयुक्तांनी गेल्या दोन वर्षांतील नाल्यांची स्थिती लक्षात घेऊन या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच पहिली बैठक घेतली होती. त्यानंतर, मार्च महिन्यातच नाल्यांचे काम सुरू करण्यात आले. मेअखेर तीन महिन्यात ही कामे पूर्ण करायची, असे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, मार्च महिन्यात केवळ 20 टक्के काम झाले. तर, एप्रिल अखेरीस 45 टक्के आणि मे अखेरीस हे काम अवघे 65 टक्के झाले आहे.
त्यामुळे, तीन महिन्यात पालिकेचे काम अर्धवट असून आता उर्वरित 38 टक्के काम 20 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र, शहरात आता पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली असून हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे, पावसाचे पाणीच नाले स्वच्छ करतात. त्यामुळे ठेकेदारांचे काम वाचून केवळ काम केल्याचे दाखवित बिले लाटली जातात.
या क्रमांकावर पाठवा फोटो
दरम्यान, आपल्या परिसरात नाले सफाई झालेली नसल्यास नागरिकांना महापालिकेकडे तक्रार करता यावी यासाठी पालिकेकडून थेट अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले आहे. या क्रमांकावर नागरिकांना केवळ व्हॉट्सअपवरून लोकेशनसह सफाई न झालेल्या भागाचे फोटो पाठविता येणार आहेत. त्यात, उपायुक्त महेश पाटील यांचा – 9689930531 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांच्या या 9689935462 या मोबाईल क्रमांकावर तक्रारी पाठवता येणार आहे.