नवी दिल्ली – 28 मे रोजी दिल्ली येथे एकीकडे नवीन संसद इमारतीचे उदघाटन अगदी शाही पद्धतीने पार पडले. तर दुसरीकडे जंतर मंतर मैदानावर कुस्तीपटूंच्या खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला एक हिंसक वळण मिळाल्याचे दिसून आले.
रविवारी ‘महिला महापंचायत’ भरविण्यासाठी कुस्तीपटुंनी नवीन संसद भवनाकडे आगेकूच केली होती. परंतु दिल्ली पोलीसांकडून त्यांना रोखण्यात आले असून आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर घडलेल्या घटनेचे काही बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेदने संताप व्यक्त करत सोशल मीडिया व आयटी सेल्स च्या लोकांना फटकारले आहे.
‘स्वतःचं खोटं पटवून देण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाऊ नका’-
संगीता फोगट आणि विनेश फोगट यांचा पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संगीता फोगट व विनेश फोगट हसताना दिसत आहेत. हा फोटो एआयच्या माध्यमातून बनवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. याच प्रकरणावर उर्फी जावेदने “लोक स्वतःचं खोटं पटवून देण्यासाठी अशा फोटोसोबत का छेडछाड करत असतात? एखाद्याला चुकीचं सिद्ध करण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाणं आणि खोट्याचा आधार घेणं योग्य नाही” असे ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारतीय कुस्तीपटू गेल्या काही दिवसांपासून खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला अनेक संघटना आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. परंतु अद्यापही खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.