नागठाणे – आकाशाला गवसणी घालणारे यश पटकाविताना शेतकऱ्याच्या लेकीने “यूपीएससी’ परीक्षेत बाजी मारली आहे. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने मिळवलेले हे अतुलनीय यश ग्रामीण भागातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. सातारा तालुक्यातील वळसे येथील प्रतीक्षा संजय कदम हिने ही किमया साधली आहे. “यूपीएससी’ परीक्षेचा निकाल नुकताच लागला. त्यात प्रतीक्षाने देशात 560 वी रॅंक मिळवत हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. प्रतीक्षाचे वडील संजय कदम शेतकरी. तिचे प्राथमिक अन् माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील छत्रपती शाहू ऍकॅडमीत झाले.
बालपणापासून अभ्यासाची चुणूक दाखविताना तिने कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पुढे लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातून ती बी. टेक. झाली. नंतरच्या काळात स्पर्धा परीक्षेतील यशाचा ध्यास बाळगून ती सतत अभ्यासात व्यस्त राहिली. उल्लेखनीय म्हणजे कोणताही क्लास न लावता तिने हे यश प्राप्त केले आहे. हे करताना स्वयंअध्ययन, स्वयंप्रेरणा या बाबी उल्लेखनीय ठरल्याचे प्रतीक्षा सांगते. आई अंबिका यांच्यासह वडिलांचे कायम लाभलेले प्रोत्साहन, पाठबळ हेदेखील तितकेच मोलाचे ठरल्याचे ती आवर्जून नमूद करते. प्रतीक्षाचा भाऊ तेजस सध्या इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे.
“केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर आयुष्यातील कोणतेही क्षेत्र असो, कष्टाची कास धरली तर यश नक्कीच मिळते. मनापासून प्रयत्न केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. अभ्यासातील सातत्य, अवांतर वाचन, नोटस् काढण्यावरचा भर यासारख्या गोष्टींमुळे हे यश साध्य झाले.
– प्रतीक्षा कदम (वळसे)