मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ‘दहाड’ या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले आहे. या वेबसिरिजमुळे सध्या ती चर्चेत आली असून तिच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. सोनाक्षीचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा राजकरणात सक्रिय आहेत. यानंतर आता सोनाक्षी देखील राजकारणात एंट्री करणार का? याचे उत्तर तिने एका मुलाखतीत दिले आहे.
सोनाक्षी म्हणाली की, “माझा राजकारणाकडे कल नाही. त्यामुळे मला राजकारणात जायला आवडणार नाही. राजकारणाबाबत मला ज्ञान आहे. पण ज्ञान असणे ही वेगळी गोष्ट आहे. मी एक क्रिएटिव्ह व्यक्ती असल्याने मला क्रिएटिव्ह क्षेत्रात जास्त आवड आहे. माझ्या वडिलांनी आपले क्षेत्र बदलले म्हणून मी सुद्धा माझे क्षेत्र बदलेन असे अजिबात नाही. मला अजून खूप काही करायचे आहे. नुकतेच मी एक उद्योजिकाही झाली आहे.”
दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर ‘दहाड’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. यात सोनाक्षी सब-इन्स्पेक्टर अंजली भाटीची भूमिका साकारत आहे. एका छोट्या शहरातील महिला पोलीस अधिकारी अंजली भाटीच्या अवतीभोवती या सीरिजची कथा फिरताना दिसते. रिमा कागती यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. एक्सेल एंटरटेन्मेंट आणि टायगर बेबी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित ‘दहाड’ हा आठ भागांचा क्राइम ड्रामा आहे.