पुणे – मी तुमच्या मुलीसोबतच लग्न करणार आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. जर तुम्ही माझे तिच्यासोबत लग्न लावून दिले नाही तर तिचे कोठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी तरुणाने दिल्यामुळे तरुणीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. 7 मे रोजी हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात घडली.
परमेश्वर रमेश पात्रे (वय 40, रा. गोंधळे नगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना जून 2022 ते 7 मे 2023 या कालावधीत घडली. याप्रकरणी पात्रे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी मुकेश गोपाळ देढे (वय 21 रा. चंदननगर) याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पात्रे यांच्या मुलीचे आरोपी मुकेश याच्या सोबत प्रेमसंबंध होते. त्यातून दोघे घरातून पळून देखील गेले होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. मात्र, आरोपी मुकेश हा कोणताही कामधंदा करीत नसल्यामुळे परमेश्वर यांचा त्याला विरोध होता. त्याच कारणातून मुकेश हा संबंधित कुटूंबियाला मानसिक त्रास देत होता. त्यामुळे त्रासाला कंटाळून परमेश्वर यांनी बाथरुममध्ये गळफास घेउन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.