प्रदीप कंद यांच्यावर शुभेच्छांसह कौतुकाचा वर्षाव
कोरेगाव भीमा – पुणे-नगर रोडवर मोठ्या प्रमाणात बॅनर लागले आहेत. इतका लोकप्रिय प्रदीप कंदासारखा नेता असेल तर शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात भाजपा जिंकल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यातील ग्रामीण मतदार संघातून किमान पाच आमदार निवडून आणायचे आहेत. पुढच्या वेळी या कार्यालयात येताना दोनशेपेक्षा जास्त आमदार येतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
लोणीकंद (ता. हवेली) येथील भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी बावनकुळे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार कै. बाबूराव पाचर्णे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत करण्यात आली.
बावनकुळे म्हणाले, प्रदीप कंद यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी भाजप काम करत आहे. साठ हजार कुटुंबांना जोडण्याचे काम करायचे आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात विमा योजना सरकारने आणली असून विमा कंपन्यांना बदमाशी करता येणार नाही. सरल ऍप आणले असून राष्ट्रवादीला कॉंग्रेसला सरळ करणार आहे. मोदींच्या नेतृत्वात वादळ फडणवीस यांच्या नेतृत्वात धडकणार असून तुमची वज्रमूठ तुटल्याशिवय राहणार नाही. एक दिलं के तुकडे हजार अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी भाजपा काही कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला तर हवेली बाजार समितीवर निवडून आलेले संचालक रवींद्र कंद, रोहिदास उंद्रे, रामकृष्ण सातव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आमदार आरोग्यदुत राहुल कुल, भाजपचे सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, भाजपच्या राज्य कार्यकारणी सदस्य जयश्री पलांडे, संचालक दादा पाटील फराटे, शिरूर भाजपचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाचर्णे आदींनी भाषणे केली.
यावेळी पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे युवा नेते विक्रांत पाटील, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य जालिंदर कामठे, गणेश कुटे, नवनिर्वाचित संचालक रोहिदास उंद्रे, जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, पीएमआरडीए सदस्य स्वप्नील उंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, राहुल काळभोर, संदीप सातव, शामराव गावडे, जयप्रकाश सातव पाटील, पेरणेच्या सरपंच उषा दशरथ वाळके, पूनम चौधरी, विजय जाचक, राहुल गवारे, नितीन पाचर्णे, कुशाभाऊ गावडे, विजय पायगुडे, नंदू भोर, लोणीकंदचे ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे, भाऊसाहेब झुरुंगे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
राजीनामाप्रकरण स्क्रीप्टेड
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जे काही घडले ते सर्व स्क्रीप्टेड होते. पक्षाच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत झालेला तीन दिवसांचा खेळ नौटंकी आणि घरगुती तमाशा होता. सत्तेपासून पैसा व पैशापासून सत्ता मिळवण्याचे काम राष्ट्रवादीने केले. दुसऱ्यांनी तयार केलेल्या शिक्षण, सहकार संस्था, साखर कारखाने जीवनभर ताब्यात ठेवल्या “ते’ राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडणार नाही असे म्हणत शरद पवार यांच्या राजीनम्यावर बावनकुळे यांनी टीका केली.
बायकोचेही मत मिळाले नाही तरी…
प्रदीप कंद म्हणाले, पीडीसीसी बॅंकेत भारतीय जनता पक्षाचा पहिला उमेदवार म्हणून निवडून येता आले. नाव चुकल्याने बायकोचे मतदान नाही मिळाले. तसेच बाजार समितीची 20 वर्षांत पहिल्यांदा निवडणूक झाली. सर्वपक्षीय पॅनल 13/2 असा निवडून आला. शेतकऱ्यांच्या मुलांना वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच यशवंत सहकारी साखर कारखाना बंद आहे, जे तालुक्याचे वैभव पुनर्प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू.