कोयनानगर (विजय लाड) – कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग चालू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी परवानगी देण्यात आली असली तरी अनेक कायदेशीर कचाट्यात अडकलेले बोटिंग कागदावरच तरंगत आहे. कोयना धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र असल्याने याठिकाणी बोटिंगला परवानगी नाही. प्रतिबंधित क्षेत्रातून काही क्षेत्र वगळल्यावर याठिकाणी बोटिंग चालू होणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातून कोणते क्षेत्र वगळायचे व बोटिंग चालू करायचे, यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेली उच्चस्तरीय समिती कोयना परिसराची पाहणी करत असून यामुळे कागदावरच तरंगणारे बोटिंग लवकरच प्रत्यक्षात कोयना जलाशयात सूरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात अधिकृतपणे बोटिंग चालू करण्यात यावे, ही पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला गत तीन वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकारने मान्यता देत मंजुरी दिली. कोयना धरणाचा समावेश अतिसंवेदनशील क्षेत्रात होत असल्याने हे ठिकाण शासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
1972 च्या अधिसूचनेत सुधारणा करण्याच्या प्रस्तावावर अभ्यास करुन शिफारस देण्यासाठी शासनाने एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीने शिफारस केल्यावर हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्रातून वगळल्यावर या ठिकाणी बोटिंग सुरू होणार आहे. यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती कोयना पाणलोट क्षेत्राची पाहणी केली आहे.
राज्य गुप्तवार्ता आयुक्त आशुतोष डुंबरे या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (मेरी) महासंचालक संजय बेलसरे, हायड्रोलॉजिस्ट डॅम सेफ्टी रिव्ह्यू पॅनेलचे नरेंद्र भंडारी, सेवानिवृत्त सचिव विनय कुलकर्णी याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक श्रद्धा जोशी यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून या समितीत समावेश आहे.