पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन आज आयोजित करण्यात आले होते. हा सोहळा यशवंराव चव्हाण सेंटर येथे पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवारांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
शरद पवार यांच्या निर्णयानंतर अनेक मंत्री आणि कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे. तसेच, शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात येत आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी यांच्याकडून पवार यांची मनधरणी सुरू असून आता पवार यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, अश्यातच आता पुण्यातील एका कार्यकर्त्याने तर चक्क स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून आपण निर्णय बदलावा अस म्हंटलं आहे. सध्या या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. संदीप काळे असं या व्यक्तीच नाव असून ते पुण्यातील रहिवासी आहे. साहेब प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप कार्यकर्ते आहे.
त्यांनी आपल्या स्वतः च्या रक्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. ‘साहेब आपण घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य नसून आपल्या या निर्णयाने आम्ही पोरके झाले असून आपण आमचे दैवत असून आपण हा निर्णय बदलावा..’ अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत.