नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या शेली ओबेरॉय यांची बुधवारी दिल्लीच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्याने ही बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौरपदी आले मोहम्मद इक्बाल यांचीही बिनविरोध निवड झाली.
या आधी महापौर पदाच्या पहिल्या निवडणुकीत जोरदार रणकंदन माजले होते. त्यामुळे चार वेळा महापोैरपदाची निवडणूक पुढे ढकलावी लागली होती. या महापालिकेत आम आदमी पक्षाकडे पुर्ण बहुमत आहे. परंतु तरीही नामनिर्देशित नगरसेवकांची आधी निवड करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. त्याला आम आदमी पक्षाने जोरदार विरोध करीत या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तेथे आम आदमी पक्षाला न्याय मिळाल्यानंतर महापौरपदावर शैली ओबेरॉय यांची निवड झाली होती. दिल्लीत प्रत्येक आर्थिक वर्षात नवीन महापौर निवडला जातो त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. दिल्लीच्या महापौरपदाचे दुसरे वर्ष खुल्या वर्गासाठी आरक्षीत आहे.
दिल्ली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक मात्र अजून रखडलीच आहे. ती सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे.