नवी दिल्ली – भाजपचे खासदार ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला असून त्यांच्यावरील कारवाईसाठी अनेक कुस्तीपटू दिल्लीत धरणे धरून बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी समर्थन दिले असून सरकार दोषी व्यक्तींला का वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे असा सवाल त्यांनी केला आहे.
प्रियकांनी म्हटले आहे की, देशाचा सन्मान वाढवणाऱ्या खेळाडूंच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि जेव्हा पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचा अहंकार गगनाला भिडतो तेव्हा असाच आवाज चिरडण्याचा प्रयत्न केला जातो असे त्यांनी म्हटले आहे. ब्रिजभुषण यांना अटक होईपर्यंत आम्ही धरणे मागे घेणार नाहीं असेही त्यांनी म्हटले आहे. ब्रिजभुषण हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले आहे असा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.
या प्रकरणी ब्रिजभुषण यांच्यावर कारवाई न करण्यासाठी दिल्ली पोलिसांवर कोणाचा दबाव आहे असा सवालहीं प्रियंकांनी केला आहे. डोळ्यात अश्रु आणून या महिला व कुस्तीगिर दिल्लीत रस्त्यावर उतरल्या आहेत पण त्यांच्याकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही असेही त्यांनी म्हटले आहे.