मुंबई – देशभरात आज रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्रनिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक राजकीय नेते देखील रमजान ईदच्या शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर अनोख्या पद्धतीने ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे.
अमोल केल्हे यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं की, ईदच्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak असं लिहिलं.. “I” लई Important… नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल! E”i”d Mubarak!” अशी पोस्ट खासदार कोल्हे यांनी केल्याने अनेकजण यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. “i लक्षात ठेवा नाही तर ED कधीही कोणाला शुभेच्छा देते”, अशी कमेन्ट एका नेटकऱ्याने केली आहे.
सध्या केंद्र सरकारकडून आणि भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भाजप व्यतिरिक्त इतर पक्षातील नेत्यांना EDची भिती दाखवली जाते, असा आरोप केला जातो. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी EID ऐवजी ED लिहून सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
यासोबतच अमोल कोल्हे यांनी अक्षय तृतीयेच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत. एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. “वर्तमान पत्रात आलेल्या ज्वेलर्सच्या जाहिरातींच्या महापूरातून खिशाची नौका सुखरूप पार करू पाहणाऱ्या बंधुना आणि जाहिरातीतील दागिना आपल्या गळ्यात असण्याची मनीषा बाळगून भावजींना गाळात घालण्याची स्वप्न पाहणाऱ्या भगिनींना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा विनोदीपद्धतीने अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.