पुणे -महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेही 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 149 कोटी 29 लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल केली आहे. यात मोठ्या प्रमाणात केंद्रशासन तसेच राज्यशासनाच्या विभागांनी थकबाकी भरलेली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, मागील वर्षी 2021-22 मध्ये या विभागास 121 कोटी 84 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर दरवर्षी या विभागास थकबाकीसह नियमित पाणीपट्टी वसुलीसाठी सुमारे 550 कोटींचे उद्दिष्ट दिले जाते.
गेल्या काही वर्षात महापालिकेच्या पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहत असल्याचे समोर आले होते. विशेषत: केंद्रशासन तसेच राज्यशासनाच्या आस्थापनांकडून हे पाणीपट्टीचे पैसे वेळवर भरले जात नाहीत. त्यामुळे यंदा या विभागाने वर्षभरासाठी पाणीपट्टी वसुलीचे स्वतंत्र केलेले नियोजन, स्वतंत्र निर्माण करण्यात आलेला मीटर सेल, शासकीय कार्यालयात केलेला सततचा पाठपुरावा, नळजोड तोडण्याच्या केलेली कारवाई, अभियंते आणि मीटर रीडर यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्नामुळे यंदा या विभागाचे उत्पन्न 50 कोटींनी वाढले आहे. शासकीय थकबाकीदारांपैकी खडकी दारुगोळा कंपनी, गॅरिसर इंजिनिअर, पुणे व खडकी छावणी, ससून, जहांगीर नर्सिंग होम, येरवडा जेल, मेंटल हॉस्पिटल, जेल प्रेस या संस्थाचा समावेश आहे. ही माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.