नांदेड – नांदेडमध्ये मालवाहू ट्रक आणि ऑटो यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये माय-लेकासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मुदखेड-नांदेड मार्गावर झाला.
सरोजा रमेश भोई, गलीअम्मा कल्याण भोई, वेजल कल्याण भोई, पुंडलिक कोल्हटकर आणि विद्या हटकर अशी मृतांची नावे आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ऑटो आणि आयशरमध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. ऑटो प्रवासी घेऊन मुदखेडच्या दिशेने येत होता. तर आयशर सिमेंटची पोती घेऊन विरूद्ध दिशेने एक मालवाहू ट्रक चालला होता. मात्र चालकांना अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची समोरा-समोर धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की ऑटोतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा उपचारावेळी मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणी मुदखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.