सोरतापवाडी (पुणे) – हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नव्यांना संधी मिळणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच केली. या घोषणेमुळे पूर्व हवेलीतील तरुणांच्या मध्ये उत्साह संचारला असून त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे या सर्व तरुणांचे लक्ष लागले आहे होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्यामुळे येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात उतरणार असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जागा कमी असुन राष्ट्रवादी कडे उमेदवारी मागण्यांसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे.
नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. तसेच पक्षीय स्तरावर पॅनेल करण्याबाबत अंतिम निर्णय लवकर घेतला जाईल असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे कार्यक्रम कसलाही असला तरी भावी उमेदवार कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसुन येत आहे. राष्ट्रवादी पाठोपाठ कॉंग्रेस, भाजप व दोन्ही शिवसेना यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये अनेक तरुण निष्ठावंत असून तिकीट मागणीसाठी त्यांनी दावा केला आहे. खरोखरच या निष्ठावंतांना बाजार समितीचे तिकीट मिळाले पाहिजे. बाजार समितीचे तिकीट मागणाऱ्यांमध्ये काही जेष्ठ मंडळी सुद्धा असून अजित दादा काय भूमिका घेतात याकडे तरुण व जेष्ठ मंडळी यांचे लक्ष लागले आहे.
निष्ठावंत की आयाराम
बाजार समितीची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून पूर्व हवेलीतील अनेक आयाराम मंडळी राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी करत आहेत. राष्ट्रवादी निष्ठावंतांना टिकिट देणार का आयारामानां याची चर्चा पूर्व हवेलीत रंगू लागली आहे.