पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात प्रवासी विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाने अतिप्रसंग केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली आहे. त्याच्यावर पूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
याप्रकरणी मूळच्या पश्चिम बंगाल येथील 18 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणी कोथरुड येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेते. ती पुणे विद्यापीठ जवळच्या परिसरातच रहाते. महाविद्यालयातून सुटल्यावर तिने कोथरुड येथून पुणे विद्यापीठात जाण्यासाठी रिक्षा केली. विद्यापीठातील काम आटोपून ती घरी जाणार होती.
दरम्यान, चालत्या रिक्षातच चालकाने तिचा विनयभंग केला. तरुणी घाबरुन रिक्षातून उतरण्याचा प्रयत्न करताच त्याने रिक्षा पळवत पुणे विद्यापीठ गाठले. तेथे सुनसान जागी थांबवली, पाऊस असल्याने वर्दळही नव्हती. त्यावर त्याने तरुणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिचा मोबाइल हिसकावून नंबर घेतला. पीडितेने कशीबशी सुटका करत पळ काढला.
यानंतर मैत्रिणीला बोलावून घेत पोलीस ठाणे गाठले. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन रिक्षा चालकास अटक केली आहे. त्याच्या वर्तवणुकीला कंटाळून त्याची पत्नीही त्याला सोडून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर करत आहेत.