पुणे – भारतीय हवामान विभागाने तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्यची शक्यता आहे.
7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज (दि. 6) नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या शक्यतेनुसार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरासह ग्रामीण भागात रविवारी अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. यावेळी गारखेडा रोडवरील एका शेतात वीज कोसळून नारळाचे झाड पेटले. या आगीत झाड पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने घटनास्थळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.