फलटण – फलटणची रेल्वे असो किंवा नीरा देवधर, राष्ट्रीय महामार्गाची जी कामे सुरु आहेत. त्यासोबतच आगामी काही काळामध्ये सुरू होणारी कामे, या सर्व कामांसह फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जी विकासकामे करण्यात आली आहेत. त्या सर्व कामांचे श्रेय हे विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचेच आहे, असा उपरोधिक टोला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “”संपूर्ण राज्यात इतर तालुक्यांच्या दृष्टीने फलटण तालुका आगामी काळामध्ये नक्कीच पुढे असणार आहे. मी जनतेच्या दारातून निवडून गेलो आहे. शेवटी जनमतातून निवडून जाणे वेगळे असते आणि विधानपरिषदेवर जाणे वेगळे असते.
मला लोकसभेला मिळालेली मते ही आजपर्यंत ज्यांना मते मिळत आहेत, त्यांची सर्व मते एकत्र केली तरी एकूण होणार नाहीत. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यातून मला आघाडी मिळाली होती. नीरा देवधर किंवा अन्य कोणत्याही प्रकल्पाचे श्रेय मी त्यांना द्यायला तयार आहे,” असे त्यांनी सांगितले.
कलम 372 बाबत नक्की कोण काय बोलत आहे त्याबद्दल मला माहित नाही. परंतु, जम्मू व काश्मीरबाबतचे कलम 370 रद्द करताना मत देण्याचे भाग्य मला माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे मिळाले आहे, हे कधीही विसरू शकणार नाही, असे सांगून ते म्हमाले, “”रामराजे खूप मोठे नेते आहेत. आता जे त्यांना दुःख होत आहे, त्या त्यांच्या दुःखामध्ये मी त्यांच्यासोबत आहे.आपण केलेल्या विकासकामांवर आरोप करून त्यांना बरे वाटत असेल तर त्यांचे सर्व आरोप स्वीकारण्यास मी तयार आहे.”
नाईकबोमवाडी येथे होत असलेल्या एमआयडीसीमध्ये कोणत्याही कंपनी येणार नाहीत किंवा एवढ्या लांब कोणत्या कंपन्या येणार, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. परंतु, सुरवडी येथे एमआयडीसी झाली तेव्हा तिथेसुद्धा हायवे नव्हता, आधी एमआयडीसी होते व नंतर हायवे होत असतो. फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे सध्या काम सुरू आहे. फलटण तालुक्याच्या सर्व बाजूने राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. आगामी काळामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापासून पासून नाईकबोंमवाडी येथील नूतन एमआयडीसी लांब नसेल. त्यापुढे जाऊन आपण ना. नितीन गडगरी यांना विनंती करून नाईकबोंमवाडीतून आता हायवे नेणार आहोत. त्याला गडकरी यांनीसुद्धा मान्यता दिली आहे. त्याचे काम काही दिवसांमध्ये सुरु होईल.
सोलापूर, म्हसवड किंवा सांगोला एमआयडीसी जाऊ शकते तर नाईकबोंबवाडीत सुद्धा येऊ शकते, असेही यावेळी खासदार यांनी सांगितले. फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे खाटा वाढवण्याचा प्रस्ताव आपण दिला होता. त्यासोबतच सिटी स्कॅनची संपूर्ण यंत्रणा उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यासाठी प्रयत्नशील होतो त्याला आता मंजुरी मिळाली आहे. उपजिल्हा रुग्णालयामधील मुजोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.