नवी दिल्ली : सध्याच्या देशात विमान प्रवास करताना काही अशा घटना घडत आहेत ज्यामुळे कोणता ना कोणता वाद निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून हवाई प्रवासात अशाच काही घटना घडत आहेत. दरम्यान, दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे तिथे पोलिसांना पाचारण करावे लागले आहे.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. मोती सिंग राठोड असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने दुबईला जाणाऱ्या विमानाचे अपहरण झाल्याची अफवा पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्पाईसजेट कंपनीचे दुबई-जयपूर SG 58 या विमानाचे अपहरण झाल्याचे ट्विट या तरुणाने केले होते.
विमानाच्या अपहरणासंदर्भातील ट्विट समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि विमानतळ प्रशासनाचा गोंधळ उडाला होता. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी सखोल चौकशी केली असता या तरुणाने विमानाला उशीर झाल्याने वैतागून हे ट्विट केले असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी या तरुणाला अटक करत स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
स्पाईसजेट कंपनीचे दुबई-जयपूर SG 58 हे विमान २५ जानेवारी रोजी सकाळी दिल्ली विमानतळावरून सकाळी ९.४५ ला उड्डाण घेणार होते मात्र खराब हवामानामुळे या विमानाला ३ तास उशीर झाला होता. दरम्यान, दुपारी १.४० मिनिटांनी या विमानाने उड्डाण घेतले.