तिरुवनंतपुरम – आयकर विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी केरळमधील कन्नूर येथे केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने भारतीय नौदलाच्या 18 कर्मचाऱ्यांसह 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये केरळ पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. सुमारे 44 लाख रुपयांपेक्षा जास्त आयकराचे खोटे रिफंड क्लेम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
आयकराचे खोटे रिफंड क्लेमचे दावे करण्यासाठी नौदलाच्या कर्मचाऱ्यांसह, पोलीस कर्मचारी आणि दोन खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एजंट आयकर रिफंडातील 10 टक्के वाटा शुल्क म्हणून घेत होते.
सीबीआयची ही कारवाई केरळचे मुख्य आयकर आयुक्त टी एम सुगंथामाला यांच्या तक्रारीवरुन करण्यात आली आहे. सीबीआयने आयपीसी कलम 420 (फसवणूक), 120-बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कन्नूरमधील अनेक नोकरदार व्यक्ती 2016-17 पासून बोगस रिफंडचा दावा करत आहेत. काही एजंट त्यांच्यापैकी काहींसाठी 10 टक्के परतावा रक्कम फी म्हणून जमा करुन आयकर रिटर्न भरत आहेत.