पुणे – “सेक्सटॉर्शन’चे गाव अशी राजस्थानातील “भरतपूर’ गावाची मागील काही वर्षांत ओळख झाली आहे. येथील प्रत्येक घरातील व्यक्ती “सेक्सटॉर्शन’मध्ये असून, त्यांनी आतापर्यंत देशभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांना फसवले आहे.कोणत्याही राज्यातील पोलीस आले, की अख्खे गाव पोलिसांवर धावून जात दगडफेक करते. यानंतर पोलिसांच्या ताब्यातून आरोपींना सोडवले जाते. यामुळे खचीतच भरतपूरमधील आरोपी पोलिसांच्या हाती लागतात. मात्र, भरतपूरवासीयांच्या डोक्यावर टिच्चून सहकारनगर पोलिसांनी सेक्सटॉर्शनमधील आरोपीला पकडले; तेही भरतपूवरवासी साखर झोपेत असताना. यासाठी तब्बल आठ दिवस ते गावकऱ्यांच्याच वेशभूषेत गावकरी म्हणून राहिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज खान (रा.भरतपूर, ता. शिक्री जि. सवाई माधोपूर, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे शिक्षण जेमतेम इयत्ता पाचवीपर्यंत झाले असून त्याने अनेकांना अशा प्रकारे फसवल्याचे समोर आले आहे. सहकारनगर हद्दीत 30 सप्टेंबर 2022 रोजी एका किशोरवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. व्हॉट्सऍपवर महिलेचा डीपी लावून पीडित मुलाबरोबर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग करण्यात आले होते.
यानंतर त्याचा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन साडेचार हजारांची खंडणी उकळण्यात आली होती. पीडित मुलाने “मै सुसाइड करणे जा रहा हुँ’ असा मेसेज केल्यानंतरही त्याला “करो… मै यह व्हिडिओ भी व्हायरल करता हुँ’………….. असे म्हणत पैशांची मागणी करुन आत्महत्या करण्यास भाग पाडले होते. दरम्यान, ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन मुलानी, अंमलदार संजय गायकवाड, सागर सुतकर, निखील राजीवडे आणि सागर कुंभार यांच्या पथकाने केली.
1800 रुपयांत सिमकार्ड
या प्रकरणातील आरोपी एक दलाल फक्त 1800 रुपयांत कोणाच्याही नावावरील सिमकार्ड मिळवून देतो. तसेच बॅंक खातेही दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर
80 हजारांत मिळते. भरतपूर गावात एकूण 700 घरे आहेत. येथील प्रत्येक घरातील व्यक्तीचे उत्पन्नाचे साधन सेक्सॉटर्शन असून, या “उद्योगात’ ते एक्स्पर्ट आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपीने बदलली 24 सिमकार्ड, बॅंक खातीही घेतली “रेंट’वर
या प्रकरणात पोलीस ऑक्टोबर 2022 पासून तांत्रिक तपास करत होते. त्यात आरोपी सातत्याने सिमकार्ड बदलत असल्याचे समजले. “सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात एखादा अडकल्यानंतर त्यासाठी वापरलेले सिमकार्ड पुन्हा वापरले जात नव्हते. तसेच पैसे घेण्यासाठी बॅंक खातीही दुसऱ्याच व्यक्तींची “रेंट’ने घेण्यात येत होती. दरम्यान, आरोपीने काही आठवडे मोबाइलही बंद ठेवला होता. यामुळे भरतपूरला पोलिसांचे पथक पोहचूनही त्यांना अडचण निर्माण झाली होती. सुदैवाने छापा टाकण्याच्या आदल्याच दिवशी आरोपीने मोबाइल ऍक्टिव्ह केला.
गावकऱ्यांच्या वेषात आठवडाभर “रेकी’
पोलीस सतत येत असल्याने भरतपूरचे नागरिक सतर्क असतात. गावात अनोळखी व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. एखादा अनोळखी दिसताच गावकरी त्याची कसून चौकशी करतात. पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, तर शे-दोनशे गावकरी हल्ला करून पोलिसांना पळवून लावतात. ही माहिती असल्याने सहकारनगर पोलिसांनी अतिशय सावधगिरी बाळगली होती. त्यांनी गावात प्रवेशाआधीच स्थानिक नागरिकांची वेषभूषा केली. त्यांचे हावभाव आणि हालचाल शिकून घेतली. रात्रीच्या वेळी एक-एक पोलीस कर्मचारी गावात फेरी मारुन आरोपीच्या घर आणि हालचालींचा शोध घेत होते. आरोपी आणि त्याचे घर सापडल्यावर त्याला गावातून घेऊन कसे बाहेर पडायचे? हा मोठा प्रश्न होता. यासाठी आरोपीच्या घरामागील शेतातील जागा पोलिसांनी त्याच्या हेरली. तेथे कोठपर्यंत वाहने येतील, ही पाहणी केली. मध्यरात्री स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून पाच किलोमीटर पायपीट करत पोलीस मुख्य रस्त्यापर्यंत आरोपीला घेऊन आले. तोवर भरतपूरवासियांना याचा सुगावाही लागला नाही.