कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या काही दिवसांपूर्वी (दि.11) ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती. सकाळी सात वाजता सुरू झालेला तपास सायंकाळी सात वाजता संपला.
त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी “कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहे. रोखायचे असेल, तर रोखून दाखवा’, असे आव्हान दिले. कोल्हापूरला सर्वप्रथम आई लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे मी मुश्रीफ यांना चॅलेंज करतो, त्यांनी आता मला रोखूनच दाखवावे. असं यावेळी किरीट सोमय्या म्हणाले होते.
दरम्यान, आता किरीट सोमय्या यांनी आपले आव्हान पूर्ण केल्याचं दिसून आलं आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्येच किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसने किरीट सोमय्या यांचे कोल्हापुरात आगमन झाले.
यावेळी ते म्हणाले की, “काही मंत्र्यांवर कारवाई झाली आहे, काहींवर होत आहे, म्हणून शक्ती मागण्यासाठी आलो आहे. कारवाई झाल्यानंतर हसन मुश्रीफांना धर्म आठवला. मात्र, आता कारवाई सुरु झाली आहे. मोदी सरकारवर कोणी घोटाळेबाज दबाव टाकू शकत नाही. न्यायालयाला कोणी प्रभाव पाडू शकत नाही’. असं भाजप नेते किरीट सोमय्या यावेळी म्हणाले. यावेळी ते समाज माध्यमांशी बोलत होते.