पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद उमटले आहेत. अश्यातच काल भाजप आमदार चंद्रकांत पाटल यांनी देखील एक वादग्रस्त विधान केलं आहे, “कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेबांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली…’ असं ते म्हणाले असून, त्यांच्या या विधानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, हे सगळं सुरु असताना ‘अफजलखानाने शिवाजी महाराजांचा कोथळा काढला असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणतात. अरे गोपीचंदा काय बोलतो. आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे’, असे म्हणत अजित पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा देखील चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार म्हणाले, “आपण शिक्षणाला देणगी दिली म्हणतो. चंद्रकांत पाटील म्हणतात भीक मागितली. तुम्ही काय बोलता? तुम्ही आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. त्यामुळं आमची का बदनामी करता? असं अजित पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त विधान….
पैठणमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, “देशात शाळा कोणी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्या शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करायची आहे, मला पैसे द्या. त्या काळात 10 रुपये देणारे होते. आता 10-10 कोटी रुपये देणारी लोक आहेत’, असे विधान त्यांनी केले.