पुणे – पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेडला एसएमई कॅटेगिरीअंतर्गत प्राथमिक समभाग विक्री करण्यास (आयपीओ) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने मान्यता दिली आहे. कंपनीने आयपीओसाठी नुकतेच डीआरएचपी फाईल केले होते.
महाराष्ट्रातून एसएमईअंतर्गत फॅशन ज्वेलरी सेक्टरमध्ये आयपीओला मान्यता मिळालेली पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी ही पहिलीच कंपनी आहे. आयपीओतून उभारली जाणारी रक्कम अतिरिक्त भांडवल, अन्य व्यावसायिक हेतू आणि विविध प्रकारच्या खर्चांसाठी वापरली जाणार आहे. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीची स्थापना भारतातील जुना ज्वेलरी ब्रँड असलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ व डॉ. रेणू गाडगीळ यांनी २०२१ मध्ये केली.
कंपनी विविध प्रकारच्या फॅशन ज्वेलरी विक्री भारतभरात ऑनलाइन आणि महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथे ऑफलाइन म्हणजे स्टोअरच्या माध्यमातून करते आहे. आगामी काळात कंपनी विविध ठिकाणी विस्तार करण्याचा विचार करीत आहे. आयपीओमार्फत कंपनी २६ लाख शेअर विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे, असे कंपनीचे संचालक अमित मोडक यांनी सांगितले.