मुंबई – मराठी चित्रपटांना थिएटर न मिळणे हा वाद काही नवा नाही. मराठी चित्रपट चालत नाही, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, म्हणून आम्हाला शो रद्द करावा लागतो, अशी अनेकदा थिएटरवाल्यांची तक्रार असते.परंतु सध्या प्रेक्षक असूनही थिएटरने मराठी चित्रपटाचा शो रद्द केल्याचा प्रकार समोर आला आहे.हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटाच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी… या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय! लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शोज कॅन्सल केले जात आहेत!
मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच! pic.twitter.com/Pj0b023E3Q— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 20, 2022
नुकताच हेमंतचा सनी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याचे अनेकांकडून कौतुक होत आहे. मात्र कल्याणमधील एका थिएटरमध्ये ‘सनी’चे बुकिंग घेऊन, शो रद्द झाल्याचे थिएटरकडून परस्पर कळवण्यात आले. याबाबत प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे थेट हेमंत ढोमेंशी संपर्क साधला. हा संतापजनक प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडला नसून राज्यात अनेक ठिकाणी ‘सनी’चे शोज अचानक रद्द करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
आपल्या अजुन एका प्रेक्षकासोबत देखील तोच प्रकार घडला… तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आलाय… SM5 kalyan मधला हा प्रकार… प्रेक्षक जात असुन देखील सिनेमा असा डावलला जाणं चुक की बरोबर? pic.twitter.com/91v8SFrbsi
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 20, 2022
याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंन ढोमे यांनी नाराजी व्यक्त केली. हेमंत ढोमे म्हणतात, ‘’थिएटरला प्रेक्षक येत नाहीत म्हणून शो रद्द करणे, कितपत योग्य आहे? एक प्रेक्षक जरी आला तरी शो दाखवला गेला पाहिजे. बुकिंग घेऊन नंतर प्रेक्षकांना शो रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे देणे, हे चुकीचेच आहे. मग आपण प्रेक्षकांना तरी दोष कसा द्यायचा? काही प्रेक्षकांनी हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार आम्हाला कळला. हे असेच सुरू राहिले तर चित्रपट चालणार कसे?’’
सातारा, नाशिक, सांगली, मुंबई, पुणे, सगळीकडे तेच! शोज नाहीत तर सिनेमा मोठा होणार कसा आणि कधी? pic.twitter.com/t6kcKzK5JT
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 20, 2022
हेमंत ढोमेने याबाबत प्रेक्षकांनी काढलेले व्हिडीओ आणि काही स्क्रिन शॉट्स देखील शेअर केले आहेत. मराठी चित्रपटांना मिळणारी वागणूक प्रेक्षक असूनही शोज न सुरु होणे यामुळे मराठी चित्रपट चालणार कसा ? असा संतप्त सवाल हेमंतने यावेळी उपस्थित केला आहे.