नवी दिल्ली – एकूण परिस्थिती पाहता देशात प्रत्यक्ष कर संकलन ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा 25 ते 30 टक्क्यांनी जास्त होण्याची शक्यता आहे असे प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांना वाटते. यावर्षी प्रत्यक्ष कर संकलनातून 14.20 लाख कोटी जमा होतील असे अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील वर्षी कर संकलनाचे उद्दिष्ट वाढविले जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलन 31 टक्क्यांनी वाढून 10.54 लाख कोटी रुपये इतके झाले असल्याची माहिती अर्थमंत्रालयाने जारी केली आहे. नागरिकाकडून कर भरणा वाढला आहे. कंपन्याकडूनही कर भरणा वाढत आहे. त्यामुळे हे कर संकलन वाढत असल्याचे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने कर संकलनाचे जेवढे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याच्या 61 टक्के इतके कर संकलन आता झाले. 1 एप्रिल ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी ही आकडेवारी असून या कालावधीमध्ये 1.43 लाख कोटी रुपयाचा परतावा देण्यात आला.
त्यामुळे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 8.11 लाख कोटी रुपये इतके झाले. गेल्या वर्षी आतापर्यंत जेवढे कर संकलन झाले होते त्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत झालेले कर संकलन 31 टक्क्यांनी आहे. नागरिकांनी जमा केलेल्या करात 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कंपन्यांनी जमा केलेल्या करांमध्ये 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
UNION BUDGET 2023 : भांडवली नफ्यावरील कर आणखी वाढणार? महसूल आणखी वाढविण्याचा….
प्रत्यक्ष कर संकलनाबरोबर अप्रत्यक्ष कर संकलन म्हणजे जीएसटीचे संकलनही वेगाने वाढत आहे. अनेक महिन्यापासून जीएसटीचे संकलन प्रत्येक महिन्याला दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होत आहे. केंद्र सरकारने कर भरण्याची पद्धत सुटसुटीत केली आहे. त्याचबरोबर कर संकलनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी कमी होत आहेत. कर भरणा सोपा झाला आहे. त्यामुळे कर संकलन वाढत असल्याचे अर्थ मंत्रालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. सरकारने केलेल्या या उपायोजनामुळे आगामी काळातही कर संकलन वाढणार आहे. कर भरणा सोपा केला जात असल्यामुळे उद्योगांना उद्योग करणे सोपे जात आहे. त्यांना कर भरणा करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही.