पुणे – लष्कर (ग्रुप सी) भरतीसाठी सुरु असलेल्या लेखी परीक्षेत कॉपी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर करणाऱ्या हरियाणातील एका तरुणास येरवडा पोलिसांनी अटक केली. अमन रामेश्वरम सिंग (वय 22 रा. चित्तुर हरियाणा) असे अटक केलेल्याचे तरूणाचे नाव आहे.
याबाबत लष्करातील सुभेदार प्रदिप शिंदे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकीतील बी. ई. जी. स्पोर्टस कॉम्लेक्समध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) लष्कर भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. अमन सिंग लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला लेखी परीक्षेत गैरप्रकार करण्यासाठी आणखी कोणी मदत केली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
लष्कर भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेसाठी अमन सिंग हरियाणातून पुण्यात आला होता. त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक साधन होते. त्याद्वारे तो उत्तरपत्रिका सोडवित होता. परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर सिंग याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली आहे.