भाष्य (सागर येवले) “लोन ऍप’चे भूत सध्या अनेकांच्या मानगुटीवर बसले आहे. एका क्लिकमध्ये ऍप डाऊनलोड होते. मात्र, त्यानंतर तुमचा सर्व डाटा संबंधित हॅकरकडे जातो. ही चूक तुमच्या आर्थिक फसवणुकीस आणि पुढे जीवावरही बेतू शकते. आतापर्यंत या ऍपच्या माध्यमातून काहींना जीव गमवावा लागला आहे.
मागील महिन्यात वारजे येथे एका तरुणीने लोन ऍपवरून कर्ज घेतले. त्यानंतर कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी संबंधित लोन ऍपच्या कंपनीने तरुणीकडे तगादा लावला. पैसे भरले नाही, तर तुमचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातील, अशी धमकी देत होते. या धमकीच्या भीतीने नातीनेच आजीचा खून करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले आणि ते मोडून कर्जाचे हफ्ते भरले.
दरम्यान, लोन ऍपवरून फसवणूक, धमकी याबाबतच्या अनेक तक्रारी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार सायबर गुन्हे शाखेने थेट बंगळुरू येथे छापा टाकून एकूण 18 जणांना ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अटक आरोपींकडे तब्बल एक लाख लोकांचा डाटा उपलब्ध असल्याचे दिसून आले. ही कारवाई झाली नसती तर एक लाख लोकांवर काय परिस्थिती ओढावली असती? असा प्रश्न उपस्थित होतो.
असा डाटा हॅक केला जातो
आज आपल्यापैकी अनेकांना “झटपट लोन मिळवा’, “एका क्लिवर पैसे तुमच्या खात्यात’ असे मेसेज येतात. त्या मोहात अनेकजण अडकतात. पैशांची गरज भासल्यास सुरक्षिततेची खातरजमा न करता तत्काळ प्ले स्टोअरमधून लोन ऍप डाऊनलोड होते. त्यावेळी ऍपकडून मागविलेली माहिती व्यक्ती सहजपणे भरतो. मात्र, ही माहिती भरताच संबधित व्यक्तीचा संपूर्ण डाटा लोन ऍप कंपनीकडे जातो. त्यावर बनावट कागदपत्रे तयार केले जातात. पैसे ट्रान्फर होतात आणि काही दिवसांतच लोनचे पैसे भरण्यासाठी तगादा लावला जातो. पैसे नाही भरले तर तुमचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जाते.
पोलिसांचे आवाहन
“लोन ऍप’ धोकादायक आहे. नागरिकांनी असे कोणतेही ऍप डाऊनलोड करू नये. तुमची एक चूक जीवावर बेतू शकते. तसेच ज्या व्यक्तींची फसवणूक झाली असेल, त्यांना धमकीचे फोन येत असतील, तर त्यांनी तत्काळ सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करावी.