नेवासा – नेवासा तालुक्यातील करजगाव येथील रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच ओढ्याला आलेल्या पावसाच्या पाण्यात आड़कल्याची घटना गुरुवारी (दि.२९ रोजी) घडली. स्थानिक तरुणांनी धाव घेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढून रुग्णवाहिका पाण्यातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टाळला.
काल रात्री झालेल्या पावसाने करजगाव-सोनई रस्त्यावरती तामतळे वस्तीजवळ असलेल्या ओढ्याला पाणी आल्याने दिनांक २९ रोजी दुपारी ४:३० वाजता रुग्णाला नेवासा येथील शासकीय दवाखान्यातून त्यांचे गावी सोडण्यासाठी ६ ते ७ रुग्ण घेऊन जात असलेली रुग्णवाहिका करजगाव-सोनई रस्त्यावरील ओढ्याचे पाण्याच्या प्रवाहात अडकली. स्थानिक तरुणांनी धाव घेत ट्रॅक्टरने रुग्णवाहिका ओढून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टाळला.
यावेळी उपस्थित मुळा धरण कृती समितीचे उपाध्यक्ष ठकाजी बाचकर, सुरेश बर्डे,तुळशीराम आयनर, शंकर गवाजीनाथ बाचकर, सावळेराम कोरडकर ,देवराम बाचकर, अशोक गायकवाड, तुषार गायकवाड, विरू बाचकर, सुनील गायकवाड, भीमराज गायकवाड, शांतीप्रसाद गायकवाड, रवी बाचकर या ग्रामस्थांनी मदत केल्याने मोठा अनर्थ टाळला.
करजगाव येथील स्थानिकांना शिंगणापूर-करजगाव मार्गे असणारा रास्ता वाहतुकीचा आहे. या मार्गावरून शिंगणापूरला जाणारी भरपूर वाहतूक असते. स्थानिक ग्रामस्थांनी व प्रवाशांनी वारंवार प्रशासनाकडे या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली आहे. परंतु या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केल्या जात आहे. वारंवार मागणी करूनही पुलाचे काम केले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली जात आहे.