लखनौ – उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची गुरूवारी समाजवादी पक्षाच्या (सप) अध्यक्षपदी फेरनिवड झाली. ते तिसऱ्यांदा सपची धुरा सांभाळतील. फेरनिवडीमुळे त्यांना पक्षाध्यक्ष म्हणून आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ लाभेल. सपच्या येथील राष्ट्रीय अधिवेशनात 49 वर्षीय अखिलेश यांच्या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
त्यामुळे ते 2024 मधील लोकसभा निवडणूक आणि 2027 मधील उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करू शकतील. सपला सध्या प्रादेशिक पक्षाचा दर्जा आहे. सपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी झटण्याचे आवाहन त्यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपने उत्तरप्रदेशात चांगली कामगिरी केली. पण, तो पक्ष भाजपला सत्तेपासून रोखू शकला नाही.